Breaking News

अफगाणिस्तान-भारत मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरु झाल्याबद्दल समाधान


अफगाणिस्तान आणि भारत या देशांमधील संबंधांना अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. हजारो वर्षांपासून उभय देशांमध्ये तसेच लोकांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होत आहे. अलिकडच्या काळात भारत अफगाणिस्तानला माहिती तंत्रज्ञान, कॉम्पुटर विज्ञान, रस्ते बांधणी, ऊर्जा संचरण (Energy Transmission), या क्षेत्रात सहकार्य करीत असून उभय देशांमधील राजकीय - आर्थिक संबंध झपाट्याने दृढ होत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरु झाल्याबद्दल अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती सरवर दानिश यांनी आज समाधान व्यक्त केले.
भारतभेटीवर आलेल्या दानिश सरवर यांनी रविवारी (दिनांक १०) महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. अफगाणिस्तान भारताशी आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, सामरिक, सुरक्षाविषयक, सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक असून चाबहार बंदरामुळे व्यापाराला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अफगाणिस्तानातील ५००० विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्तीवर महाराष्ट्रात शिक्षण घेत असून एकट्या पुणे येथे ३५०० अफगाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगत भारताने विद्यार्थी शिष्यवृत्तींची संख्या अधिक वाढवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तान भारतासह विविध शहरांमध्ये आगामी काळात संयुक्त सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारत तसेच अफगाणिस्तानातील चित्रपट निर्माते देखील उभय देशांच्या इतिहासावर आधारित एक चित्रपट निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने अफगाणिस्तानला काबुल येथे संसद भवनाची इमारत तसेच सलमा धरणाच्या रूपाने भारत-अफगाण मैत्री धरण बांधून दिल्याबद्दल त्यांनी भारताप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. अफगाणिस्तानच्या पुणर्उभारणीमध्ये भारताने प्रशासन सुधार, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, क्षमतावर्धन या बाबींमध्ये मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.