Breaking News

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.


सततची नापिकी व डोक्यावर वाढत असलेले बँकेतील व खाजगीत घेतलेले कर्ज, त्यातच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे हताश झालेल्या हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावातील तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. 

मृतक शेतकऱ्याचे नाव भोलेश्वर विठ्ठल देवतळे (३५) असे आहे. फुकटा हिवरा शिवारात ४ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यावर बँक ऑफ इंडिया वडनेर शाखेचे १ लाख व ग्रामीण विकास बचतगट तसेच उज्ज्वला बचतगट यांचे प्रत्येकी ५० हजार असे २ लाख रुपये कर्ज होते. 

सततच्या नापिकीने भोलेश्वर देवतळे हे कर्ज फेडण्याच्या चिंतेत राहात होते. सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे हताश झालेल्या भोलेश्वर देवतळे याने घरीच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.