Breaking News

सरपंच' नसताना नांदगावचा झाला कायापालट, समाजकल्याणचे सभापती परहर कडुन कामाची पाहणी


कुळधरण/प्रतिनिधी/- सरपंच,उपसरपंचाच्या नेतृत्वाखाली गावाचा कारभार चालतो . गावाचे राजकारण , समाजकारणासह गावगाडा सरपंचाकडुन हाकला जातो . कर्जत तालुक्यातील नांदगावची दोन्ही पदे गेल्या तीन महिन्यांपासुन रिक्त आहेत . तरीही गावाच्या विकासकामावर त्याचा कसलाच परिणाम झाला नाही . कर्जतचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक परमेश्वर सुद्रिक आणि ग्रामसेवक श्याम भोसले यांनी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन गावाचा कायापालट केला आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सर्वत्र स्वच्छ भारत अभियान सुरु आहे . शासन , प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकारातुन कामाला गती येत आहे . कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे सर्वच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतुन गावाचा 'लुक' बदलु लागला असुन , नवीन वर्षारंभी गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त होणार आहे .

गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण , भुमिगत गटार आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत . वैयक्तीक शौचालयाची बांधकामे वेगाने सुरु आहेत .कर्जत पंचायत समितीचे अधिकारी,ग्रामसेवक आणि ग्रामस्थांच्या समन्वयातुन गाव विकासाची वाट धरत असल्याचे चित्र आहे . जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर , पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांनी नांदगाव येथे येवुन या सर्व विकासकामांची पाहणी केली . गावाचे बदलते रुप पाहुन मान्यवरांनी समाधान व्यक्त केले . गावात ३०६ कुटुंबे आहेत . ३४ कुटुंबाकडे अगोदरच शौचालये होती . २३३ कुटुंबासाठी शौचालयाची कामे अंतिम टप्प्यात आहेत . ३९ कुटुंबासाठी नवीन वर्षात कामे पुर्ण होतील व गाव हागणदारी मुक्त होईल अशी माहिती ग्रामसेवक श्याम भोसले यांनी दिली .