आता मोकाट कुत्र्यांपासुन नगरकरांची सुटका ?
शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून नगरकरांना भेडसावणारा बनला आहे. यावर तोडगा म्हणून मोकाट कुत्रे पकडण्याचे काम ठेकेदारामार्फत केले जात होते. संबंधीत ठेकेदारांनी काम बंद केल्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून, कुत्रे पकडण्या बाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. परंतु यावर बर्याच दिवसांपासून तोडगा निघत नसल्याचे दिसत होते. यावर महानगरपालिकेमार्फत मोकाट कुत्रे पकडणार्या कर्मचार्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही हंगामी काम देण्याबाबत मागणी केली.
दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांबाबत नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आणि कर्मचार्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मनपामध्ये तत्परतेने काम सुरू करणे गरजेचे होते, त्यादृष्टीने मनपाकडून कार्यवाही करण्याचा संबंधीत अधिकार्यांना आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार या मोहीमेसाठी 12 कर्मचार्यांची नेमणूक करून या कामास सुरूवात करण्यात आली आहे.
आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी याबाबत कर्मचार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे कर्मचारी प्रभागनिहाय प्रभाग अधिकारी आणि स्वच्छता निरिक्षक यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम पाहणार असुन शहरामध्ये पकडलेल्या कुत्र्यांना पिंपळगाव माळवी येथील डॉग होस्टेल या ठिकाणी ठेवण्यात येत असून या ठिकाणी कुत्र्यांवर नसबंदीच्या शस्त्रक्रीया, लसीकरण, औषधोपचार, अन्न पुरवठा केला जातो. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची सर्वतोपरी उपाय योजना करणार असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी यावेळी सांगितले.