Breaking News

‘मेक इन महाराष्ट्र’साठी जर्मन उद्योजकांचा पुढाकार


महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ऊर्जा, ऑटोमोबाईल आदी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासोबतच विविध व्यापार व औद्योगिक सहकार्य करण्यासाठी जर्मन उद्योजक सहकार्य करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जर्मनीच्या लोअर सेकसोनी या हॉर्नवर येथील शिष्टमंडळाने रामगिरी येथे चर्चा केली. त्याप्रसंगी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये जर्मन प्रशासनाचे संचालक पीटर आयझन स्मीथ, जर्मनीच्या सुजान हॅनोअर जर्मन इंडिया बिजनेस सेंटरचे संचालक साकेत पुजारी, क्रिसेंडो वर्ल्डवाईडचे अध्यक्ष विशाल जाधव, जर्मन इंडियन बिजनेस इंटरनॅशनल सेंटरच्या व्यवस्थापक नुपूर लोखंडे, क्रिसेंडो वर्ल्डवाईडच्या विदेश गुंतवणूक विभागाच्या प्रमुख सायली इंगवले, टॉरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक भारत गिते यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

मेक इन महाराष्ट्रअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर्मन देशाच्या भेटीत इन्व्हेस्टमेंट समीट अंतर्गत येथील उद्योजकांना राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात आवाहन केले होते. त्यानुसार एरोस्पेस, समुद्रातील लाटांपासून ऊर्जा निर्मिती, ऑटोमोबाईल कार, सुटे भागांच्या निर्मितीसंदर्भात राज्यात गुंतवणूक करण्याबाबत सहकार्य करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच हॅनोवर मेसेन या जगातील सर्वात मोठ्या व्यापार व औद्योगिक प्रदर्शनांतर्गत जर्मनीतील तीन प्रमुख शहरामध्ये प्रदर्शन आयोजित करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. हे प्रदर्शन क्रिसेंडो वर्ल्डवाईडतर्फे आयोजित करण्यात येणार आहे.