Breaking News

कुराणवाडीसह प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत

राहुरी, प्रतिनिधी - कुरणवाडी व १९ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा काल संध्याकाळ पासूनच जोडला गेला. काल ही योजना सुरळीत सुरु राहणेसाठीच्या विषय़ावर ताहाराबद य़ेथील संत महिपती महाराज मंदिरात बैठक झाली. आ. शिवाजी कर्डिले बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 


आ. म्हणाले, ही योजना होऊन तेरा वर्षे झाली आहेत. तिच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव तयार केला जावा. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून तिला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. काही कोटी रुपये खर्चून ही योजना कार्यान्वित झाली आहे. सात गावांनी योजनेतून सहभाग काढून घेतला आहे. त्याचा भार अन्य गावांवर पडतो आहे. त्या गावातील वाड्या वस्त्यावर पाणी पुरवठा केला जावा. अधिक संख्येने नळजोडणीची संख्या वाढण्यावर भर दिला जावा. या योजनेची परत तांत्रिक पाहणी करण्याची गरज आहे. त्या बाबत संबधित अधिका-यांना सूचना दिल्या जातील.

गटविकास अधिकारी इशाधीन शेळकंदे म्हणाले, पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरु राहीली पाहिजे. त्यासाठी योजनेची वसुली जास्तीत जास्त चांगली करण्यावर भर द्यावा लागेल. जे पाणीपट्टी वेळेवर भरतात,  त्यांचेवर पाणीपट्टी न भरणारेकडून अन्यायच होतो आहे. संबधित थकबाकीदारांना नोटीसा पाठविल्या जातील. वसुलीबाबत सहकार्य केले जावे. स्वच्छ व शुध्द पाणी पुरविले जाते आहे. आपल्या आरोग्यावरील खर्च यामुळे कमी होतो आहे. योजना बंद पडली तर टॅकर हा त्यासाठी सक्षम पर्याय नाही हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. योजना समितीचे अध्यक्ष अमोल भनगडे म्हणाले, प्रतिमहा किमान पाच लाख रुपये महावितरणला हप्त्यापोटी दिले जातील. एक कोटी दहा लाख रुपये थकबाकी आहे. ती भरणेसाठी पाणीपट्टी भरुन सहकार्य़ करावे.
पाणीपुरवठा समितीचे सदस्य व सरपंच व ग्रामस्थ सभेस हजर होते. महावितरणचे अभियंता धीरज गायकवाड यांनी वरिष्टांच्या आदेशानुसार पाणी योजनेचा वीजपुरवठा जोडला जाईल. परंतू थकबाकी वसुलीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. नारायण झावरे यांनी सुत्रसंचालन केले तर ताहाराबादचे माजी सरपंच शरद उदावंत य़ांनी आभार मानले.