Breaking News

अधिवेशनात सरकारची कसोटी कर्जमाफी, जाहिरातबाजी विरोधकांच्या अजेंड्यावर.

नागपूर : राज्यात हिवाळी अधिवेशनानिमित्ताने विरोधकांच्या टीकेची धार तीव्र झाली असून, राज्यसरकारला हिवाळी अधिवेशनानिमित्त सरकारला कर्जमाफी, कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवरून राज्यसरकारला टीकेचा सामना करावा लागू शकतो. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला आजपासून सुरूवात होत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली. 


सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली असून, या सरकारचे दोनच लाभार्थी आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरे उद्धव ठाकरे. सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, जाहिरातबाजी, नेत्यांचे घोटाळे झाले असून, या तीन वर्षांत राज्याचे वाटोळे झाले. शेतकरी कर्जमाफी म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही राज्यातील 1500 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. शेतकर्‍यांना या सरकारने कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्र दिली आहेत. तसेच आता डेमेज कंट्रोलसाठी सरकार बँकेत पैसे टाकत असल्याची घणाघाती टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

  नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरतला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. ओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. दरम्यान, ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे युती सरकारच्या काळात झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. यासोबतच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार हे मुद्दे उचलले आहेत. त्यामुळे आता सरकारला अधिवेशनात चांगलाच विरोध पाहायला मिळणार आहे.

राज्यात पारदर्शकता वेडी झाली : मुंडे 
महाराष्ट्रात पारदर्शकतता वेडी झाली अशी टीका राज्य सरकारच्या कारभारावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. गुजरातमध्ये जसा विकास वेडा झाला तशी महाराष्ट्रात पारदर्शकता वेडी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतरच्या पेत्रकार परिषदेत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.

कर्जमाफी शेतकर्‍यांची नावे वेबसाईटवर टाका : विखे 
बीटी बियाणांच्या मुद्यावर बोलताना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सरकारला चिमटे काढले. बी म्हणजे भाजप आणि टी म्हणजे ठाकरे असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने चाळीस लाख शेतकर्‍यांची नावे वेबसाईटवर टाकावी अशी मागणीही त्यांनी केली.