Breaking News

आमदार निवास घोटाळ्यासह न्यायमंदीरातील भंगारावरील दरोडा विधीमंडळात

गरमागरम चर्चेच्या भीतीने हस्तसिध्द भ्रष्टाचार्‍यांचे चेहरे पडले पांढरे

मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा शाखेच्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या गैरव्यवहाराला अभय देणार्‍या शक्ती उच्च न्यायालय सेवाकेंद्रातील भंगार मालावर दरोडा टाकणार्‍या दरोडेखोरांनाही संरक्षण देत असल्याने हे प्रकरणही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याचा निर्धार चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे. दरम्यान विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत असल्याने आमदार निवास इमारतीच्या गैरव्यवहारावर विधीमंडळात गरमागरमा चर्चा अपेक्षित असल्याने संशयितांमध्ये खळबळजनक अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.

आमदार निवास इमारतीच्या कामात गोंधळ करून कोट्यावधी रूपयांचा अपहार केलेल्या कार्यकारी अभियंता, सहअभियंता यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा असताना त्यांना क्लीन चीट देण्याची धडपड साबां पातळीवर सुरू आहे. शहर इलाखा कार्यालयातील कर्मचार्‍यांपासून साबां मंत्रालयातील सर्वोच्च पदापर्यंत प्रत्येक पातळीवर हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकुणच सार्वजनिक बांधकाम खाते हे हिरवे कुरण आहे. इथे खायचे असते, एकमेका सहाय्य करू निती अंमलात आणायची असते अशी धारणा या प्रकरणाने आणखी घट्ट होत असतानाच या विभागातील शाखा अभियःता विजय बापट यांनी उच्च न्यायालयाच्या आवारातच हस्तसिध्द भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.

    श्री.विजय बापट, शाखा अभियंता, न्यायालय सार्वजनिक बांधकाम सेवा केन्द्र मुंबई यांनी न्यायालयाचे मौल्यवान (बीटीसी लाकूड) साहित्य, जुने लोखंडी कपाट, खिडक्या, दरवाजे, टेबल, खुर्च्या, पोलादी वस्तू, चोरून भांडुप(सोनापूर) येथील भंगार विक्रेत्यांला विकले. न्याय निवाडा करणार्‍या न्याय मंदिरावर दरोडा टाकून बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने उरली, सुरली बांधकाम विभागाची अब्रू घालवली आहे. या सबंधी भ्रष्ट अधिकार्‍यांचे कर्दनकाळ ठरलेले भाजपचे आमदार चरणभाऊं वाघमारे यांनी दिनांक 29/11/2017 रोजी राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली. 

या तक्रारीवर मुख अभियंता सा.बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईचे केडगे यांना सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिलेत. चोर प्रशासना पेक्षा अधिक चौकस आणि सुज्ञ असतात, हे चोर प्रशासनातील असतील तर अधिक चौकसता आणि हुशारी फळते. याचा दाखला या प्रकरणातून मिळाल्याचे बोलले जात आहे. त्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्राप्त माहिती अशी की, सुटीचे दिवस लक्षात घेऊन बापट यांनी भंगार मालाची चोरी केली. तरीही एक प्रश्‍न निरूत्तरीत राहतो. 

उच्च न्यायालयाच्या आवारात पोलीसांचा पहारा सतत जागता असतो. इतकेच नाही तर परिसरात सीसीटीव्ही कार्यरत आहे. मग हे भंगार कुणी कसे चोरले याची माहिती मिळत नाही. हे जाणीवपुर्वक घृडवले जात आहे. चोर माहित असूनही साबां प्रशासन चौकशी करीत नाही म्हणून ज्यांनी आमदार निवासाचा घोटाळा चव्हाट्यावर आणला ते आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे. इतकेच नाही विधीमंडळाच्या अधिवेशनात आ. वाघमारे आमदार निवास घोटाळा आणि न्यायमंदीरातील भंगार चोरीचा मुद्दा सन्माननीय सभागृहासमोर ठेवणार असल्याने साबां विधीमंडळाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे या दोन्ही प्रकरणातील हस्तसिध्द भ्रष्टाचार्‍यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. 

या संदर्भात सविस्तर तपशील उद्याच्या अंकात.(क्रमशः)

भ्रष्टाचारात स्वीय सहायक श्रीनिवास पाटील यांचा मोठा हात 
सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणे समोर येऊ लागले असून, यापाठीमागे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वीय सहायक श्रीनिवास पाटील यांचा हात असल्याचे समोर येऊ लागले आहे. साबांतील अभियत्यांना हाताशी धरून, तर भ्रष्ट अभियत्यांना पाठीशी घालत, श्रीनिवास पाटील साबांमध्ये गैरव्यवहारांचे विक्रम रचत आहे, त्या सर्व गैरव्यवहारांचा संपूर्ण वृत्तांत लवकरच दैनिक लोकमंथनमध्ये.