Breaking News

शिवाजी महाराज स्मारक उभारताना मासेमारीवर परिणाम होऊ नये : महादेव जानकर

मुंबई : मच्छिमार बांधवांच्या समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प उभारत असताना मासेमारीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी राज्य शासन काळजी घेईल, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाशी निगडीत मच्छिमारांच्या समस्यांबाबत स्थापन झालेल्या समन्वय समितीची बैठक मंत्री जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यावेळी मच्छिमार समाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प उभारताना मच्छिमारांच्या रोजगाराच्या समस्या, स्मारका शेजारच्या समुद्रात मासेमारी करणे आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. समन्वय समितीची व्याप्ती ठरविणे व समितीमध्ये मच्छिमार सोसायट्यांच्या दोन सदस्यांचा तसेच प्रकल्पाशी संबंधित विभागांचा समावेश करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जानकर म्हणाले की, मच्छिमार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाची नेहमीच सकारात्मक भूमिका आहे. शिवस्मारकामुळे कोणत्याही मच्छिमार बांधवांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही. 

या प्रकल्पामुळे मस्त्यव्यवसायावर होणार्‍या संभाव्य परिणामासंदर्भात सेंट्रल फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत तसेच मच्छिमार सोसायट्यांमार्फत स्वतंत्र अहवाल मागविण्यात यावेत. मच्छिमार समाजातील तरुणांना रोजगार उपलब्धतेसाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मच्छिमार सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी तसेच मच्छिमार बोटींच्या माहितीसाठी आधार क्रमांकाशी जोडण्याचा विचार सुरू असल्याचेही श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी मच्छिमार सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या.