Breaking News

दखल - गुजरातमधील सत्तेनंतरचा भाजपतील वणवा


जीवावरचं बोटावर निभावलं, अशी आपल्याकडं एक म्हण आहे. भाजपचं गुजरातमध्ये अगदी तसंच झालं. 16 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा अल्पमतांनी झालेला पराभव लक्षात घेतला, तर काँग्रेसनं भाजपची दमछाक केली. पाटीदार समाज, दलित, मुस्लीम, इतर मागासवर्गीयांची मोट बांधून वेगळं सामाजिक अभिसरण करण्यास काँग्रेसला यश आलं. पाटीदार समाज काँग्रेसच्या मागं जाणर नाही, यासाठी हार्दिक पटेल यांच्या सहकार्‍यांना लाखो रुपये मोजून फोडलं. पाटीदार समाजाच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांना उमेदवार्‍या दिल्या; तरीही पाटीदार समाज भाजपवर नाराज आहे. शहरी भागातील व्यापार्‍यांच्या नाड्या सरकारच्या हाती असतात, त्यामुळं तेथील पाटीदार समाजानं भाजपला साथ दिली असली, तरी ग्रामीण भागातील पाटीदार समाजानं भाजपकडं पाठ फिरविली, त्याचं कारण भाजपच्या सरकारच्या काळात शेतीचं चांगलं उत्पादन घेऊनही तीस ते चाळीस टक्के भाव कमी मिळाला, हे आहे. पाटीदार समाज हाच शेतकरी असल्यानं ग्रामीण भागात भाजपला मोठी हानी पत्करावी लागली.
गुजरातच्या एकूण मतदारांत पाटीदार समाजाच्या मतदारांचं प्रमाण 13 टक्के असून प्रभावी असलेल्या या समाजघटकांकडं दुर्लक्ष करता येत नाही. आनंदीबेन पटेल यांना पाटीदार समाजाच्या आंदोलन हाताळण्यातील चुकीची शिक्षा देण्यात आली. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं. त्यांच्यानंतर नितीन पटेल यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागावी, असा आनंदीबेन यांचा प्रयत्न होता; परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. नितीन पटेल यांची संधी गेली. अन्य दुसर्‍या कुणा पटेलालाही संधी दिली नाही. त्यामुळं ही पटेल समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा यांच्यावर नाराज होता. 

गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यानं पेटवलेल्या वणव्यातून भाजपनं कसाबसा मार्ग काढला असला; परंतु हा वणवा अजून ़शांत झालेला नाही. पूर्वी गुजरातमध्ये पंतपˆधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात कुणी ब्र शब्द काढण्याची हिमंत दाखवू शकत नव्हता. देशात आता मोदी व शहा यांच्याविरोधात बोलणार्‍यांची संख्या वाढली आहे. गुजरातच्या निवडणुकीत तेथील सरकारमधील मंत्री पुरुषोत्तम सोलंकी यांनी थेट राहुल गांधी व काँग्रेसचं कौतुक करीत घराणेशाहीचं समर्थन केलं होतं. त्यांनी उघडउघड भाजपलाच आव्हान दिलं होतं. त्यांना आता मंत्रिमंडळात घेणं भाजपला भाग पडलं आहे. ज्याच्या मागं फारशी राजकीय ताकद नाही, त्यांची आता मोदी व शहा यांच्यावर टीका करण्याची हिंमत झाली आहे. मोदी व शहा यांना पक्षांत गटबाजी चालत नाही, असं सांगितलं जात होतं; परंतु गुजरातमध्ये पक्षाला कमी यश मिळण्यामागंही शहा व आनंदीबेन यांच्यातील गटबाजी कारणीभूत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. गुजरातमध्ये सत्ता मिळाली, मंत्रिपदाचं वाटप झालं. तेच वाटप आता वादाचं कारण ठरलं आहे. मोदी व शहा यांना पटेल स्वस्थ बसू देत नसल्याचं चित्र आता दिसतंय. कारण आता त्यांचेच निष्ठावान शिलेदार उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. हवी ती खाती न मिळाल्यानं ते नाराज असून पˆसंगी राजीनामाही देऊ शकतात, असं सूत्रांकडून समजतं. 

गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी 26 डिसेंबरला मोठया थाटात पार पडला. पंतपˆधान मोदी, अमित शहा आणि 18 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; परंतु या मंत्रिमंडळात सगळं आलबेल नाही. अर्थ, नगरविकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्त्वाची खाती न मिळाल्यानं नितीन पटेल चांगलेच खवळले आहेत. खाती वाटपाचा अधिकार जरी मुख्यमंत्री रुपानी यांचा असला, तरी नितीन पटेल यांना नावालाच उपमुख्यमंत्रिपद आणि त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्यांकडं चांगली खाती. यामुळं नितीन पटेल यांचं पित्त चांगलंच खवळलं. गेल्या वर्षी पाटीदार समाजाचं आंदोलन भडकलं असताना, नितीन पटेल यांना मुख्यमंत्री करायचं जवळपास निश्‍चित झालं होतं; पण शेवटच्या क्षणी विजय रुपाणींचं नाव पुढं आल्यानं पटेलांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळीही ते थोडे खट्टू झाले होते; पण खातेवाटपात त्यांची नाराजी दूर करण्यात आली होती. या वेळी मात्र वित्त आणि नगरविकास ही खाती त्यांना मागूनही मिळालेली नाहीत. त्यामुळं शुक्रवारी त्यांनी सचिवालयाकडं पाठ फिरवली आणि उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभारही स्वीकारला नाही. 

दोन दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास स्वाभिमानाच्या मुद्द्यावर पद सोडण्याचा इशारा नितीन पटेल यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. नितीन पटेल यांच्यासारख्यांनी जनतेशी विश्‍वासघात करण्यापेक्षा जे खातं मिळालं आहे, त्याच्या माध्यमातून निस्वार्थी जनसेवा करण्याकडं लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला देणं सोपं आहे; परंतु ते स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखंही आहे. नितीन पटेल यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या सौरभ पटेल यांच्याकडं अर्थखातं देण्यात आलं आहे, तर नगरविकास आणि पेट्रोलियम ही खाती रुपाणी यांनी स्वतःकडं ठेवली आहेत. त्यामुळं नितीन पटेल नाराज होणं स्वाभावीक आहे. असं असलं, तरी मंत्रिमंडळात खातेवाटपावरून कुठलाही वाद, मतभेद नाहीत; असलेच तर ते आम्ही दूर करू, अशी सारवासारव भाजपचे पˆदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी केली आहे; परंतु मोदी व शहा यांचं होमपीचही तेवढं चांगलं नाही, तिथंही अडथळे आहेत, हे यानिमित्तानं स्पष्ट झालं आहे.