Breaking News

वाळके, सुर्यवंशी, जाधव त्रिकुटावर विसंबला चंपांचा कारभार ,मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शकतेचाही उरकला कार्यभार

नागपुर/विशेष प्रतिनिधी : मंत्रालय ते आमदार निवास या मार्गावर शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ, पारदर्शक कारभाराची चिरफाड करीत असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील जाणीवपुर्वक दाखवित असलेली स्थितप्रज्ञता(?) एकूण कारभारावरच संशयाचे ढग निर्माण करीत आहे. बहुचर्चीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे खाजगी सचिव श्रीनिवास जाधव या त्रिकुटाने साबां मंत्र्यांची केलेली दिशाभूल सरकारच्या विश्‍वासार्हतेचा लिलाव करीत असलेली विधीमंडळ सदस्यांमध्ये असलेली चर्चा वेगळाच संदर्भ निर्माण करू पहात आहे.


चोरांच्या टोळीतील एखाद्या सदस्याने दरोड्याचा तपास करावा, आपल्या सहकार्‍यांना तपासात दोषी ठरवावे आणि पुन्हा सजा होऊ नये म्हणून रदबदली करावी असा काहीसा प्रकार मुंबई शहर इलाखा साबांतील पाच कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात सुरू असल्याचे वास्तव सध्या चर्चेत आहे. मुंबईतील आमदार निवास विशेषतः मनोरा आमदार निवासातील आमदारांच्या कक्ष दुरूस्तीसाठी नियमांना बगल देऊन शासनाच्या कोट्यावधी रूपयांची फसवणूक झाल्याचे अनेक विधीमंडळ सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. मार्च 2016-17 या काळात शहर इलाखा साबां विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी कोट्यावधी रूपयांची देयके कामे न करताच अदा करणे, मनोरा आमदार निवासाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इमारत कुठल्याही क्षणी पडणार अशी वातावरण निर्मिती करून मोठ्या रकमेची हेराफेरी करणे असा गैरव्यवहार झाला अशी माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर या गैरव्यवहाराला वाचा फुटली.

आमदार निवासातील दहा कक्षांत काम न करताच तीन कोटी सत्तर लाख एकावन्न हजार रूपयांची देयके खोटी एमबी नोंद करून अदा केली. याविषयी दि. 27 जुलै 2017 रोजी मुख्यमंञ्यांकडे आलेल्या तक्रारीवरून प्रधान सचिवांच्या आदेशावरून अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी चौकशी करणे, चौकशीत गैरव्यवहार झाला हे मान्य करून अन्य दोन सहअभियंत्यांसह तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर ठपका ठेवणे या प्रक्रिया पार पडल्या.

मात्र चौकशी अहवाल ग्राह्य धरून दोषींवर कारवाई करणे अपेक्षित असतांना चौकशी अधिकारी असलेले अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. कधी आ.चरणभाऊ वाघमारे यांना अपरात्री आमदार निवासात जाऊन भेटणे, मंत्री महोदयांचे नाव सांगून प्रज्ञा वाळके यांना निलंबीत करता येऊ नये दादांची इच्छा असल्याचा निरोप देणे, साबांच्या उच्च पदस्थांनांही मंत्र्यांचा दबाव असल्याचे सांगून कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेवर कारवाई टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. अरविंद सुर्यवंशी प्रशासकीय पातळीवर वाळके यांची तळी उचलून धरण्यात आपली प्रज्ञा खर्च करीत होते तर तिकडे मंत्री पातळीवर साबां मंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव हे या गैरव्यवहाराविषयी चंद्रकांत दादा पाटील यांना खोटी माहीती देऊन त्यांची दिशाभूल करीत होते.

अरविंद सुर्यवंशी, श्रीनिवास जाधव आणि स्वतः प्रज्ञा वाळके यांनी या काव्यातही संगनमत करून साबां प्रशासन आणि साबां मंत्री यांची दिशाभूल करून हा कोट्यावधी रूपयांचा गैरव्यवहार दाबण्याचा कुटील प्रयत्न केला आणि या त्रिकुटाने पुरवलेल्या खोट्या माहितीवर विश्‍वास ठेवून चंद्रकांत दादा पाटील यांनी सभागृह शासन आणि जनतेची दिशाभूल केली. चंद्रकांत दादा पाटील या त्रिकुटावर विसंबून राहिल्याने केवळ कोट्यावधीचा गैरव्यवहार दाबला जाईल असे नाहीतर, दादांच्या हातून एकावेळी सभागृह, शासन आणि जनतेचा विश्‍वासघात होतो आहे. त्याचा फटका मुख्यमंत्र्यांची विश्‍वासार्हता रसातळाला जाईल आणि जनतेच्या मनात सरकारविषयी असलेली उरली सुरली सहानुभूतीही नष्ट होईल अशी भिती सत्ताधारी आमदार व्यक्त करीत आहेत.