Breaking News

खाकीतील गुंडाचे दर्शन; पोलीस उपनिरीक्षकाने कुटुंबाला केले बेघर

सोलापूर - सांगली येथील पोलिसांच्या गैरकृत्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातदेखील कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील मोहन जाधव यांच्यासह कुटुंबियांना राहत्या घरातून पोलीस उपनिरीक्षकाने बाहेर काढले आहे. या अन्यायाविरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक म्हणून काम करणार्‍या संजय धोत्रेंच्याविरोधात जाधव कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

मोहन जाधव (रा. वाखरी, ता. पंढरपूर) यांच्या घरी पोलीस उपनिरीक्षक धोत्रे हे पोलीस गाडी घेऊन गेले होते. यावेळी घर खाली करण्यासाठी त्यांनी दमबाजी केल्याचा दावा जाधव कुटुंबाने केला आहे
जागेचा वाद असललेल्या व्यक्तींकडून पैसे घेऊन धोत्रे यांनी गुंडाचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जागेच्या वादाबाबत न्यायालयात प्रकरण दाखल आहे. तरीही गुंड गिरी मार्गाचा अवलंब करणार्‍या उपनिरीक्षकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्या मोहन जाधव यांनी केली आहे. याबाबात पोलीस उपनिरीक्षक संजय धोत्रे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान धोत्रे हे पोलीस वाहनासह नियमबाह्यरीत्या वाखरी गावात गेल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाकडे असल्याचे जाधव कुटुंबाने स्पष्ट केले आहे.