विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात- गिरीश बापट.
मौजे पेरणे येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक श्री.बापट यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे झाली, त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी ही सूचना केली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबुराव पाचर्णे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.
श्री.बापट म्हणाले, विजयस्तंभास भेट देणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा द्याव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तेवढे टँकर, फिरते स्वच्छतागृह, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, अग्निशमन दलाच्या गाड्या, विद्युत पुरवठा, सी.सी.टी.व्ही यंत्रणा आदी सर्व सुविधा देण्यात याव्यात. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी. आवश्यक असल्यास वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करावा. याठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. याकरीता पोलीस प्रशासनाने स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घ्यावी.