Breaking News

सोनई, शिंगणापूर भागातील अवैध्य धंद्यामुळेच गुन्हेगारीत वाढ

सोनई - गेल्या कित्तेक वर्षांपासून सोनई आणि शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरासपणे चालू असलेले मटका, जुगार, दारू अड्डे खाजगी सावकारकी या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली त्यामुळे सोनई आणि शनी शिंगणापूर पोलीस हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढून त्याचे रूपांतर टोळी युद्धात होऊन एकाला आपला जीव गमवावा लागला याचीच चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. मारामाऱ्या, दहशत ह्या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. 


त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी यात लक्ष घालून एखाद्या खमक्या अधिकाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. मुलाखा वेगळे गाव असलेले शनी शिंगणापूर गाव या गावाला भेट देण्यासाठी देश, विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सोनई - शिंगणापूर हा परिसर शांत म्हणून ओळखला जायचा अवैध्य धंद्यामुळे व गुन्हेगारीमुळे बदनाम होत असल्याबद्दल सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी शनी शिंगणापूर येथील पार्किंग मध्ये दिवसाढवळ्या टोळी युद्धातून एकाचा खून करण्यात आला. वैशिष्टय म्हणजे शिंगणापूर पोलीस ठाण्यापासून १००० फुटावर हि घटना घडली ज्याचा खून झाला तो आणि ज्याच्यावर आरोप आहे तो दोन्ही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंतगर्त व्यवहार आणि वर्चस्वामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे या प्रकरणात बरेच पैलू असावेत याची स्थानिक पोलीस यंत्रणेला काहीच गुप्त माहिती मिळाली नाही अथवा माहिती गृहीत असताना कुठल्याही कठोर कारवाया झाल्या नाहीत हे पोलीस यंत्रणेच अपयश मानले जात आहे सोनई व शनी शिंगणापूर हे गुन्हेगाराचे अभयस्थान असण्याचे बोलले जात आहे .

कारण या भागातील बहुतांश व्यावसायिकांकडे गावठी कट्टे आहे या पूर्वी देखील तोफखाना पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्यांनी सोनई शिंगणापूर मधील ८ ते १० जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली मात्र स्थानिक पोलिसांनी कधीच कट्टेवाल्यावर कधी ठोस कारवाई केल्याचे ऐकवीत नाही आताही बऱ्याच जणांकडे कट्टे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटना स्थळी पोलिसांनी दोन गावठी कट्टे जप्त केल्याचे समजते. तर गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर पोलीस गुप्तचर यंत्रणेचे डोळेझाक का? याची सुद्धा चौकशी होण्याची गरज आहे. सोनई आणि शनी शिंगणापूर भागातील अवैध्य धंद्यांना उधाण आलेले असताना या धंद्यांना मिळणारे अभय कुणाचे? वाढणारे गुन्हेगार त्याचे पाठराखण करणारे कोण त्यामुळे पोलीस यंत्रणा बदनाम होऊ पाहत आहे. 

सोनई आणि शिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आले दिवस घालावयाचे. अधिकारी कलेक्टरला सर्वकाही अलबेल असल्याचे भासवून कुठल्याही घटनेचे गांभीर्य वरिष्ठापर्यंत जाण्याचे टाळतात. जिल्यातील बऱ्याच ठिकाणी जुगार अड्यावर मोठमोठ्या कारवाया झाल्या अनेक मटका बुकी जुगार अड्डा चालक गजाआड करण्यात आले परंतु या भागात मटका जुगार बुकी खुलेआम वावरत आहेत. स्थानिक पोलीस महिनाभरात एखादी पंटर केस दोनशे रुपये जास्त दाखवून फक्त कागदोपत्री कारवाई दाखवत आहेत. परंतु रोजीरोटीसाठी काम करणाऱ्याला गरिबाला आरोपी दाखवण्या ऐवजी कोट्यवधींची मालमत्ता मिळवणाऱ्या मटका बुकी किंवा जुगार अड्डा चालकाला गजाआड करण्याचे धाडस स्थानिक पोलीस करताना दिसत नाहीत यामध्ये मोठे अर्थकारण असण्याची चर्चा झडत आहे. या भागातील गुन्हेगारी नष्ट करायची असल्यास एखादा खमक्या अधिकारी नेमण्याची गरज आहे. दारू, मटका, जुगार अवैध्य सावकारकी समूळ नायनाट करण्याची मागणी या परिसरातून होत आहे.