Breaking News

दहा हजार रूपयांची लाच घेताना शाखा अभियंत्यास अटक

सांगली, दि. 13, डिसेंबर - पाटबंधारे कार्यालयाकडील मोजणीदाराकडून दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय 55, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमें ट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरानजीक, सांगली) या शाखा अभियंत्यास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.


तक्रारदार हे सांगली येथील पाटबंधारे विभागात मोजणीदार आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या म्हैसाळ शाखेकडील सन 2016- 17 चे आकारणी पत्रक तयार करून ते स्वाक्षरीसाठी प्रमोद अकोलकर यांच्याकडे सादर केले होते. मात्र स्वाक्षरी करण्यासाठी प्रमोद अकोलकर याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. पैसे दिले, तरच स्वाक्षरी करणार असल्याचेही सांगितले होते. परंतु चर्चेनंतर या दोघात दहा हजार रूपये देण्याचे निश्‍चित झाले होते.

याविरोधात संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटबंधारे विभागाच्या मिरज येथील कार्यालयात सापळा रचला होता. त्यावेळी संबंधिताकडून दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना प्रमोद अकोलकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी प्रमोद अकोलकर याच्याविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.