Breaking News

सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे,मागील वर्षी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या अडचणी समोर आल्या होत्या, त्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात आल्याने हे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या अकोला जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बजोरिया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिष पिंपळे, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाण्डेय यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहीरी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पोलिसांसाठी घरे, कृषी पंपांसाठी वीजजोडणी, आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, सिंचन प्रकल्प आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेतला.