Breaking News

संपादकीय - सत्तेचा रसायनाचा गुणधर्म!

सत्तेच्या रसायनात असलेले गुणधर्म अजूनही विद्वान राजशास्रज्ञांना सापडले नाहीत.हे रसायन शरिरात आणि बुध्दीत भिनले की भल्या भल्या समाज धुरीणांचे भान हरपते.अक्कल गहाण पडते.सत्ता गेली की मग झांज उतरते.तरीदेखील उरलेला अंश बरळण्यास प्रोत्साहन देतो.सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण या रसायनाच्या गुणधर्मावर प्रखरपणे बोट ठेवत आहे.


विद्यमान सत्ताधार्यांकडून राज्यात सुरू असलेला प्रमाद पाहिल्यानंतर एखाद्या नवोदीत बेवड्याने पहिल्या धारेची ढोसून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालावा तसा प्रकार नजरेसमोर तरळून जातो.नवशिक्या दारूड्या भान लगेच सोडतो.कधीतरी संधी मिळाली म्हणून कुवती पेक्षा अधिक ढोसली जाते मग उघड्यावर नंगा नाच करतो.तसे या मंडळीचे सुरू आहे.बेवड्याचे स्वतःवर,स्वतःच्या वाणीवर नियंञण राहत नाही.आपला भुतकाळ तो पहिल्या घोटात विसरतो.आणि मग त्याच्या सारखा सर्व विद्या निपुण शास्री एकमेव तोच या भावना जाग्या होतात पुढचे दिव्य शब्दात व्यक्त करण्याची गरज नाही.
अगदी हिच परिस्थिती सध्या दिसते आहे.विरोधक काय आणि सत्ताधारी काय? दोघेही या बेवड्याच्या भुमिकेत वावरत असतात.फरक इतकाच की कुणी वाईनबारचे तर कुणी कंट्री वाईड.सत्ताधार्यांच्या अपयशावर बोट ठेवून जनकैवारी रस्त्यावर उतरले म्हणून सत्ताधारी त्यांना त्यांच्या भुतकाळातील पापाची आठवण करून ब्लाकमेल  करीत आहेत. 

हल्लाबोल कराल तर तुमच्या कुंडल्या काढू अशा धमक्या दिल्या जातात.गुमान बसलात तर कुंडलीला हात लावणार नाही आसा प्रेमाचा सल्लाही यात गृहीत आहे हा भाग निराळा.लोकशाहीत आंदोलने करायचीच नाहीत का? कोणतेही आंदोलन असले की ते साम-दाम-दंड-भेद वापरून पायाखाली कुस्करण्याचा परवाना म्हणजे सत्ता आहे का?
अर्ध काम करा, अर्धे पैसे माध्यमांना द्या. असा सल्ला आधिकार्यांना सत्ताधारी देतात,ही त्यांची शुध्द.ठार बेवडाही एवढे भान तर नक्की बाळगतो,तेही या मंडळींनी बाळगले नाही. नको. विरोधकही फार शहाजोग आहेत असे नाही.गेली पंधरा वर्ष या मंडळींच्या हातून जाणीव पुर्वक घडलेला जनद्रोह ही मंडळी इतक्या लवकर विसरली.याचा अर्थ सत्तेच्या झांजेतून ते बाहेर येऊ लागलेत.

आज त्यांना हल्लाबोल करण्याची उपरती झाली असली तरी त्या पापाचे अवशेष अधूनमधून अडथळा आणित आहेत.बेवड्याला उतारा मिळाला नाही तर त्याचा जीव कासावीस होतो.हातपाय मारू लागतो.विरोधकांची ती अवस्था आज दिसत आहे.थोडक्यात सत्तेची चटक लांडग्याच्या तोंडाला लागलेल्या बकरीच्या रक्तापेक्षाही भयानक आहे.तो सत्तेच्या रसायनात असलेल्या गुणधर्माचाच परिणाम म्हणावा लागेल.