Breaking News

शहर इलाखा गैरव्यवहार प्रकरणी चौकशीने घेतला वेग

अधिवेशनाच्या तोंडावर होणार्‍या घडामोडींनी भ्रष्टांचे धाबे दणाणले


मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा साबां विभागातील बहुचर्चित मनोरा आमदार निवास इमारतीच्या देखभाल दुरुस्तीच्या गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेले भ्रष्ट अभियंते विरूध्द लोकप्रतिनिधी यांच्यात सुरू असलेले शितयुध्द आता निर्णायक वळणावर असून अधिवेशनाच्या तोंडावर फ्लाईंग स्क्वाडच्या चौकशीला वेग आल्याने भ्रष्ट अभियंत्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर वेगाने सुरू झाली असली तरी प्रत्येक टप्यावर साबांतील भ्रष्ट अभियंत्यांच्या लॉबीने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचे तक्रारदार आ. चरणभाऊ वाघमारे दोन पातळीवर लढत असून रीतसर फौजदारीही त्यांनी दाखल केली आहे. दुसर्‍या बाजूला त्यांच्या पाठपुराव्यामुळेच अधिक्षक अभियंता चामलवार यांच्या फ्लाईंग स्क्वाडमार्फत समांतर चौकशी होत आहे.

आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिनांक 27/7/2017  व  दिनांक 12/9/2017 रोजी पुराव्यानिशी लेखी तक्रार करुन त्यांच्या कक्षासह 31 आमदारांच्या कक्षात कामे न केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सचिव(साबां)आशिषकुमार सिंग यांना सखोल चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले. प्रधान सचिवांनी दि.5/8/2017 रोजी दहा आमदारांच्या रुमचा तपास अरविंद सूर्यवंशी(अधिक्षक अभियंता)मुंबई यांना दिला. सुर्यवंशी यांनी  वस्तुनिष्ठ अहवाल दि.5/10/2017 प्रधान सचिवांना सादर केला. त्या अहवालात 10 पेकी 9 आमदारांच्या कक्षात कामे झालीच नाहीत असा ठपका श्रीमती प्रज्ञा वाळके(कार्यकारी अभियंता), भूषण फेगडे(उप अभियंता), केशव धोंडगे(शाखा अभियंता) यांच्यावर ठेवण्यात आला. 

प्रधान सचिवांनी उपअभियंता व शाखा अभियंता यांना तात्काळ निलंबित केले व श्रीमती वाळके (कार्यकारी अभियंता) यांची अकार्यकारी पदावर नवी मुंबई येथे बदली केली. विषयाचे गांभीर्य ओळखुन उर्वरित 21 आमदारांच्या कक्षाचा तपास धनंजय चामलवार (अधिक्षक अभियंता) सा. बां. दक्षता पथक मंडळ, मुंबई यांना दि. 17/10/2017  रोजी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा, असा लेखी आदेश दिला.श्री. चामलवार यांनी आपल्या पथकासह दि.6/12/2017 बुधवार रोजी तपासकामी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या रुमची आमदार महोदयांच्या समवेत पाहणी केली. विधीमंडळाचे अधिवेशन ऐन तोंडावर असताना या गैरव्यवहाराशी संबंधित घडामोडींनी वेग घेतल्याने भ्रष्ट अभियंत्यामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

उच्च न्यायालयावरच शाखा अभियंत्याचा 80 लाखांचा दरोडा !
सार्वजनिक बांधकाम विभागतील भ्रष्ट्राचाराच्या सुरस कथा रोजच बाहेर येत असून, उच्च न्यायालयातील सेवाकेंद्र येथील भंगाराची परस्पर विल्हेवाट लावत 80 लाखांचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न श्री व्हि.एस बापट शाखा अभियंता यांनी केल्याचा प्रताप समोर आला आहे. यांसदर्भात आ. चरणभाऊ वाघमारे यांनी ना. चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकारममंत्री यांच्याकडे यासंबधीची लेखी तक्रार दिली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, इलाखा शहर सांबा विभाग मुंबई अंतर्गत पश्‍चिम उपविभाग, मलबार हिल, मुंबई यांच्या अधिपत्याखाली उच्च न्यायालय (साबां) मुंबई येथील व्हि.एस बापट शाखा अभियंता यांनी सुट्टीच्या कालावधीत उच्च न्यायालयातील हेरीटेज इमारतीचे निघालेले बी.टी.सी लाकूड व अन्य साहित्य ज्याची अंदाजे किंमत 80 लाख रूपये आहे. 

त्याची अप्सेट व्हल्यू निश्‍चित न करता कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग साबां विभाग, मुंबई यांची कोणतीही मंजूरी न घेता परस्पर स्वतचे अधिकार वापरून सदर उच्च न्यायालयातील उपयोगी, निरूपयोगी साहित्य (किमान 9 ट्रक) चोरून श्री व्हि.एस बापट यांनी विकले आहेत. यामध्ये शासनाचा लाखो रूपयांचा निधी बुडालेला आहे. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय हे न्यायमंदिरावरच 80 लाख रूपयांचा दरोडा श्री बापट यांनी टाकला आहे.