Breaking News

संपादकीय - नीच’ म्हणणारे ‘निलंबित’ तर ‘साले’ म्हणणारे ‘अध्यक्षपदी’

बाळकुणाल अहिरे :- गुजरात विधानसभा निवडणूकांचे वातावरण तापले आहे. पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल, राष्ट्रीय दलित युवा मंचचा अध्यख जिग्नेश मेवाणी, ओबीसी चेहरा अल्पेश ठाकूर या त्रयीने भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर काँग्रेस मध्ये आलेला, उत्साह, राहूल गांधी यांनी आपली पप्पू प्रतिमा पुसत, पंतप्रधान मोदी यांना तगडे आव्हान निर्माण केल्यामुळे, गुजरात निवडणूकांमध्ये खर्‍या अर्थाने रंगत आणली होती. 


मात्र काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतांना, म्हणाले की, डॉ. आंबेडकर स्मारकांचे मोदी राजकारण करत आहेत, डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान आहे, मात्र मोदी हे नीच प्रवृत्तीचा त्यांनी उल्लेख केला. यांच्या या वाक्याचे राजकारण मोदी करणार नाही, तर ते मोदी कसले. नीच प्रवृत्तीचा संबध त्यांनी नीच जातीशी जोडून, गुजरातच्या जनतेला भावनिक आवाहन करत, निवडणूकांमध्ये लाभ उठविण्याचा प्रयत्न केला.

बिहार विधानसभा निवडणूकांमध्ये मोदी यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका करतांना, नितीशकुमार यांच्या रक्तातील डीएनएमध्ये फरक असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा फटका भाजपला सहन करावा लागला. नितीशकुमारांच्या रक्तातील डीएनएचा संबध बिहारच्या जनतेशी जोडल्यामुळे, मोदी यांचे वक्तव्य बिहारच्या जनतेला उद्देशून असल्याचे रंगवून सांगण्यात नितीशकुमार यशस्वी झाले होते. पर्यायाने त्याचा मोठा फटका भाजपला बसला होता. तसाच फटका मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे 
काँग्रेसला होऊ शकतो, याची पुरेपूर जाणीव काँग्रेसला असल्यामुळेच काँग्रेसने तात्काळ मणिशंकर अय्यर यांना कारणे दाखवा नोटीस जारी करत, त्यांचे निलंबन करण्यात आले. 

काँग्रेस त्यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील संपुष्ठात आणण्यात आले. यातून तीन वर्षांपूर्वींची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यात कमालीचा फरक जाणवतो. पाच राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणूकांत मणिपूर, गोवा या राज्यातील विधानसभा निवडणूकांचा निकाल हाती आल्यानंतर सर्वात जास्त जागा या काँगे्रसकडे होत्या, मात्र तत्काळ निर्णय न घेऊ शकल्यामुळे, व काँग्रेस गाफील राहिल्यामुळे भाजपने बहूमताची जुळवाजुळव करत, मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा बसवला होता. 

काँग्रेसने या तीन वर्षांत जो गाफीलपणा दाखवला होता, तो आता संपुष्ठात आला असून काँग्रेस तत्काळ निर्णय घेऊ लागली असल्याचे चित्र आहे. मणिशंकर अय्यर यांचे निलंबन ही त्याचीच साक्ष आहे. तर दुसरीकडे भाजप मात्र या निमित्ताने उघडे पडले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एका जाहीर सभेत शेतकर्‍यांना संबोधित करतांना म्हणाले होते की, हे साले सारखे रडतच राहतात. यावरून दानवे यांच्यावर संबध महाराष्ट्रातून टीकेची झोड उठविण्यात आली होती. 

आंदोलने, मोर्चाचा मार्ग अवलंबत शेतकर्‍यांनी रोष प्रगट केला होता. मात्र यासंदर्भात भाजपने व दानवे यांनी देखील कोणतीही माफी मागितली नाही. किंवा पक्षाने त्यांना पदावरून निलंबित देखील केले नाही. मात्र याउलट मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी माफी मागावी असे सू चित केले होते, त्याप्रमाणे मणिशंकर अय्यर यांनी त्यांची माफी देखील मागितली. राहिला प्रश्‍न बेताल वक्तव्याचा तर, यापूर्वी भाजपच्या अनेक खासदार, मंत्री मोहदयांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यांचा सपाटाच लावला होता. 

मात्र त्या वक्तव्याचा कोणत्याही भाजप नेत्याने समाचार घेतला नाही. की ते वक्तव्य भाजप या पक्षाच्या पंरपरेला शोभणारे नाही, असे वक्तव्य केले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदार खासदारांनी केलेल्या वक्तव्याला त्यांच्याच पक्षांकडून अभय मिळत आहे. तर दुसरीकडे मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा पराचा कावळा करण्यात येत आहे. वास्तविक मणिशंकर अय्यर यांच्या विधानाशी कोणीही सहमत होण्याचे कारण नाही, त्यांचे वक्तव्य निषेधार्यच आहे. 

मात्र भाजप जेव्हा मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करते, तेव्हा हाच पक्ष दानवे यांच्या विधानांचा, परेश रावल, अनुपम खेर यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध का करत नाही ? राजकारणांतील खिलाडूवृत्ती जवळजवळ संपल्यातच जमा असून, सर्व राजकारण हिंदुत्वाच्या अजेडंयापाशी फिरत असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून अनेकवेळेस विकासाचा बागुलबूवा करण्यात आला. मात्र गुजरात निवडणूकामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान करण्याची वेळ जवळ आली असतांना देखील भाजपाने गुजरात विकासाचा जाहीरनामा प्रकाशित केलेला नाही. 

त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणूकांच्या प्रचारादरम्यान, विरोधकांचा सामना करतांना भाजपला जाहीरनामा सादर करण्याची वेळ मिळाली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संपूर्ण कें द्रीय मंत्रिमंडळ, विविध राज्यातील भाजपाचे खासदार गुजरातमध्ये तळ ठोकून आहे. तरी काँग्रेसचा हल्ला परतवून लावण्यात संपूर्ण मंत्रीमंडळ अपयशी ठरतांना दिसून येत आहे. 

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात आपण शिवभक्त असल्याचे सांगणार्‍या राहूल गांधीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही पक्ष आंबेडकरांपेक्षा बाबा भोलेबाबा बाबत अधिक बोलत आहे. पंतप्रधान मोदी यांचे बोलण्यामागचे हे प्रयोजन म्हणजे, राहूल गांधी यांनी गुजरातमधील बहूतांश मंदिरात भेटी देत, त्यांच्या संत, महतांचे आशीवार्द घेत, भाजपची हक्कांच्या असणार्‍या हिंदू व्होट बँकेला खिळखिळे करण्याचा हा प्रयत्न होता. 

त्यामुळे भाजप धास्तावला आहे. हार्दिक पटेल यांच्यामुळे पाटीदार समाज भाजपवर नाराज आहे. तर दुसरीकडे नोटाबंदी व जीएसटीमुळे बहूसंख्य ओबीसी समाज भाजपवर नाराज आहे, त्यांचे नेतृत्व अल्पेश ठाकूर करत आहे. तर दुसरीकडे उना प्रकरणांमुळे दलित समाज नाराज आहे, त्यांचे नेतृत्व जिग्नेष मेवानी करत आहे. राहूल गांधी यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करता, संपूर्ण गुजरात निवडणूकामध्ये आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचमुळे कपिल सिब्बल यांचे अयोध्याप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसने सिब्बल यांना देखील गुजरात निवडणूकांच्या प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.


लेखक हे दैनिक लोकमंथनचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत आहे.