Breaking News

महिला ग्रामपंचायत सदस्यास पळवून नेत विनयभंग

सरपंचावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी नेले होते महिलेला पळवून ; 
पालकमंत्र्यांच्या तालूक्यातील प्रकार 


जामखेड प्रतिनिधी : सरपंचावर अविश्‍वास ठराव आणण्यासाठी महिला ग्रामपंचायत सदस्यास जबरदस्तीने पळवून नेत मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी उपसरपंचासह नऊ जणांविरोधात जामखेड पोलिसांत विनयभंगाचे गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तालुक्यातील धामणगांवमध्ये घडली. पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सरपंचपदाचे राजकीय युध्द रंगल्याने राजकीय पटलावर तणावाचे वातावरण पसरले आहे.

जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत सदस्या शोभाबाई महादेव थोरात वय 45 यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी माझे पती महादेव थोरात, मूलगा पप्पाजी थोरात व सून सोनूबाई व नातवंडासह गावाच्या शिवारात शेतवस्तीवर राहते. धामणगावचे सरपंच महारूद्र विष्णू महारनवर हे असून मी गेल्या अडिच वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य आहे. माझा मुलगा व सून ऊसतोडणीच्या कामासाठी सोलापूर येथे गेले असल्याने मी व पती दोघेच राहतो दि 15 डिसेंबर रोजी आम्ही जेवण करून झोपलो होतो रात्री दहा वाजता घराबाहेर मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. 

आम्ही घराबाहेर आलो असता समोरच दोन पांढर्‍या रंगाच्या गाड्या उभ्या दिसल्या व गावातीलच नाना दगडु महारनवर, विश्‍वनाथ दगडु महारनवर, सतीश शाहू घूमरे, सूरेश शाहु घूमरे, संतोष बापूराव महारनवर यांच्यासह इतर चार अनोळखी माणसे गाडीतून उतरत माझ्या मालकाला तूमची पत्नी कोठे आहे म्हणत मारहाण करू लागले मी मध्ये सोडवण्यासाठी आले असता संतोष बापूराव महारनवर याने काठी उगारत तू आत्ताच्या आत्ता आमच्या गाडीत बस असे म्हणून ओढू लागला. 

डोक्याचा पदर खाली पडला तसेच मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू आमच्या पार्टीकडे आली नाही तर तूझ्याकडे बघून घेतो असे म्हणाला त्याचवेळी आमच्या वस्तीकडे एक वाहन येत असताना त्याची लाईट दिसल्याने सदरचे सर्व लोक दोन्ही गाड्यासह पळून गेले. 

त्यानंतर सरपंच महारूद्र विष्णू महारनवर पार्वती महारनवर केशव महारनवर घरी आल्यानंतर त्यांना माहिती देत, आम्ही जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहेत.