Breaking News

जयंत पाटलांची धनगर वेशात ‘एन्ट्री’

नागपूर: धनगर समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी धनगर वेशात विधानसभेत प्रवेश केला. या वेशभूषेद्वारे त्यांनी सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले होते.यावेळी जयंत पाटील यांनी हातात काठी आणि खाद्यांवर घोंगडी अशा धनगरी वेशात त्यांनी सभागृहासमोर आपले म्हणणेही मांडण्याचा प्रयत्न केला.


सरकारला राज्यातील धनगर समाजाचा विसर पडल्याचे दिसत आहे. सरकारला धनगर समाजाच्या मागण्यांची जाणीव करून देण्यासाठीच मी हा पेहराव केल्याचे पाटील यांनी सांगितले. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले, असा सवालही त्यांनी विचारला. सरकारने याबाबतीत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण धनगर समाज हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. यादरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी, हे तुमचं काठी घेण्याचे वय नसून, तशी वेळ तुमच्यावर येऊ नये अशी इच्छा विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केली. पाटील यांच्या या अभिनिवेशामुळे ते आज, विधीमंडळ परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरलेत.