Breaking News

नितीन आगे खून प्रकरण : नगर जिल्हा न्यायालयात होणार नव्याने फेरसुनावणी !

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणात नव्याने खटला चालवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिले. सर्व साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवली जाणार असून, पुरावेही नव्याने सादर करावे लागतील. विशेष म्हणजे, फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाई होणार आहे, एवढेच नाही, तर न्यायालयाने आगे कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याचेही आदेश दिलेत. 


नितीन आगे खून प्रकरणात अहमदनगर सत्र आणि जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर नितीनच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर खटला पुन्हा चालवण्याचे आदेश दिलेत. नितीन आगे या विद्यार्थ्याची खर्ड्यामध्ये हत्या करण्यात आली होती. नितिन आगे खून प्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालणार. संपूर्ण साक्षीदारांचे नव्याने साक्ष घेऊन, नव्याने पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. फितूर साक्षी दारांविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. आगे यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश आहेत.

जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन आगे या दलित युवकाचे सवर्ण जातीच्या एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून शाळेतून मारहाण करीत बाहेर नेऊन त्याचा खून केल्याच्या प्रकरणी सर्वच्या सर्व 9 आरोपींना अहमदनगरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक हुडे यांनी निर्दोष जाहीर केले आहे.
नितीन आगे हा दलित युवक होता.त्याचे गावातीलच एका सवर्ण जातीच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. 

याच कारणावरून आरोपींनी 28 एप्रिल 2014 रोजी खर्डा गांवातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत घुसून सर्वांदेखत मारहाण करीत नितीन आगे याला शाळेतून बाहेर नेले होते.मारहाण करणार्‍यांनी नितीनला जवळच्या डोंगरावर नेऊन प्रचंड मारहाण केली. तसेच त्याला एका झाडाला लटकवून त्याने आत्महत्या केल्याचा देखावा केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात नितीन आगेचा मृत्यु मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले होते.

दलित युवकाचा खून झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. अनेक दलित संघटनांनी गावोगावी मोर्चे काढून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.अखेरीस नितीन आगेचे वडील राजु आगे यांच्या फिर्यादीनुसार, खर्डा पोलीस ठाण्यात 13 जणांविरूध्द खुनाचा तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.