Breaking News

स्मार्टफोनमुळे तरुणांना येऊ शकते नैराश्य.

सध्या इंटरनेटचे युग असल्याने स्मार्टफोन ही जगभरात काळाची गरज बनली आहे. तसेच हे एक संपर्काचे सर्वात मोठे साधनही आहे. परंतु याचा जास्त वापर करणे किशोरवयीन मुलांसाठी अपायकारक असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. 


सध्या मोठ्या संख्येने तरुण मुले ही स्मार्टफोनचा वापर करू लागली आहेत. मात्र हा वापर प्रमाणाबाहेर झाल्यास या मुलांमध्ये नैराश्य, राग अनावर होणे व कमी झोपेचा धोका वाढू शकतो, असा इशारा एका नव्या संशोधनात देण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील कोरिया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. 

जी मुले स्मार्टफोन आणि इंटरनेटचा प्रमाणाबाहेर वापर करतात, त्या लहान मुलांमधील मेंदूची प्रक्रिया असंतुलित बनल्याचे संशोधनात आढळून आले. स्मार्टफोन व इंटरनेटची जास्त सवय असलेल्या मुलांच्या मेंदूचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी मॅग्‍नेटिक रिस्पॉन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला.