भेदभावाला खतपाणी घालणारे अभ्यासक्रम बंद करायला हवे -राजन खान
पुणे : जिथे फक्त ज्ञानार्जनासाठी जायचे, त्या विद्यापीठांमध्येच ग्रामीण, दलित, आदिवासी ..असे भेदभावांना खतपाणी घालणारे अभ्यासक्रम असतात. ते आधी विद्यापीठांनी बंद करावेत, अशी आक्रमक मागणी साहित्यिक राजन खान यांनी केली.साहित्यिक कलावंत संमेलनात ‘सामाजिक परिवर्तन व मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. विद्यापीठे ज्ञानार्जनासाठी असतात.
तिथे सारे भेद संपवून फक्त विद्यार्थी घडावेत, हा हेतू आहे. पण आपल्या विद्यापीठांमध्येच जातीयता शिकवणारे अभ्यासक्रम आहेत. ते शिकून आपले वेडे विद्यार्थी पुन्हा ‘जात’च शिकतात व समाजात जातीयताच वाढत राहते. शिक्षण व समाजातील हा विरोधाभास जाणून आधी असे अभ्यासक्रम बंद करा, अशी मागणी खान यांनी केली. ‘आज घराघरात ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा सापडेल, पण ती वाचलेले नेमके किती? हा प्रश्न आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी महात्मा फुले यांचे समग्र ग्रंथ अत्यल्प किमतीत विकले. ते हातोहात संपले. इतके खंड विकले गेले तर समाजात क्रांतीच होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात फक्त जातीयता वाढलेली दिसते, असेही ते म्हणाले.