यशार्थ`मुळे सारंगखेडाचे महाभारतकालीन संदर्भ जगासमोर आले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सारंगखेडा, ता. शहादा, जि.नंदुरबार येथे चेतक फेस्टिव्हलनिमित्त आयोजित अश्व संग्रहालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हीना गावित, आमदार डॉ.विजयकुमार गावित, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, नंदुरबारचे जिल्हाधिकारी अनिल पाटील,चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस, पर्यटनमंत्री श्री.रावल यांनी चित्र व छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या ई-डिजिटल साप्ताहिक `यशार्थ`ने सांरगखेडा यात्रेवर प्रकाशित केलेल्या विशेष लेखांचे स्वतंत्र दालन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मांडले आहे.
या दालनाची पाहणी मुख्यमंत्री श्री.फडणवीस,मंत्री श्री.रावल, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी केली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले,की `यशार्थ`मुळे सारंगखेडाचे महाभारतकालीन संदर्भ जगासमोर पुढे आले आहेत. `यशार्थ`चा उपक्रम सार्थ व कौतुकास्पद असून आतापर्यंत प्रकाशित सर्वच्या सर्व म्हणजे 19 अंक मला विविध घटक व हितचिंतकांकडून प्राप्त होत असून ते आपण पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले.