आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राला उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विशेष प्रमाणपत्र
नवी दिल्ली येथे 14 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये ‘स्टार्ट अप ॲण्ड स्टॅण्ड अप महाराष्ट्र’ या संकल्पनेसह महाराष्ट्राच्या ‘स्टार्टअप आणि स्टँडअप महाराष्ट्र’ या दालनास सजावट व सादरीकरणासाठी विशेष ‘प्रशंसा प्रमाणपत्र’ मिळाले आहे. हे प्रमाणपत्र 27 नोव्हेंबर 2017 रोजी उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदिप कांबळे यांनीस्वीकारले होते.
राज्यात ‘स्टार्टअप आणि स्टँडअप’ योजनेच्या माध्यमातून नव्याने उद्योग उभारणी करणाऱ्या राज्यातील प्रतिभावान तरूण उद्योजकांचे प्रकल्प दर्शविण्यात आले होते. प्रदर्शनात या योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारणाऱ्या राज्यातील 60 उद्योजकांचे स्टॉल्स होते. तरूण उद्योजक अमोल यादव यांनी तयार केलेले भारतीय बनावटीचे विमान, इनोव्हेटीव्ह पार्किंग सोल्युशन, 15 मिनीटांमध्ये ‘वेब पोर्टल’ तयार करून देणारे स्टार्टअप, मुंबई आयआयटीच्या विद्यार्थीनीने तयार केलेले कमी किमंतीत उपलब्ध होणारे महिलांचे सॅनेटरी नॅपकीन व नॅपकीन तयार करणारी कमी किमंतीतील मशीन आदी महत्वपूर्ण स्टार्टअप्स या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.
अमोल यादव या तरूण उद्योजकाने निर्माण केलेल्या विमानाची प्रतिकृती दालनाच्या मुख्यद्वाराचे खास आकर्षण होते. मुंबई-अहमदाबाद ही देशातील पहिली बुलेट ट्रेन, मुंबई नागपूर समृद्धीमार्ग आणि त्याचे फायदे ही याठिकाणी दर्शविण्यात आले होते. याशिवाय राज्यातील लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तू, महिला उद्योजिकांद्वारे निर्मित वस्तू, महाराष्ट्राची प्रसिद्ध पैठणीही याठिकाणी प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आले होते.
