कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे - मुख्यमंत्री
दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार कालिदास कोळंबकर, सोसायटीचे अध्यक्ष अरविंद वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कालसुसंगत शिक्षण महत्त्वाचे आहे. आपल्याला फक्त पदवीधर तयार करुन चालणार नाही. हे पदवीधर रोजगारास पात्र निर्माण व्हायला हवेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि सामाजिकतेची जाण निर्माण होईल याचाही शिक्षणामध्ये समावेश वाढवला पाहिजे. शिक्षण संस्थांचे मूल्यांकन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण संस्था, विद्यापीठे यांना जास्तीत जास्त स्वायत्तता देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. इंडियन एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण क्षेत्रात फार महत्त्वाचे योगदान आहे. संस्थेने आपल्या शतकमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभीमागील काळाचे सिंहावलोकन करण्याबरोबरच भावी काळाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.