Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू


नागपूर, दि. - नागपूर-अमरावती महामार्गावरून भरधाव वेगाने जाणा-या अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव पेपर मील नजीकच्या घुलीवाला पुलावर आज, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमाराला ही घटना घडली.

बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणा-या या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ व बिबट्यांसह अन्य वन्य श्‍वापदांचा वावर वाढला आहे. सदर वाघीण संध्याकाळच्या सुमाराला राष्ट्रीय महामार्गावरील घुलीवाला पूल ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याच वाघिणीने आठवडाभरापूर्वी पाचनवरी शिवारात एका गाईची शिकार केली होती. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून या घुलीवाला पुलावर वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील वर्षी याच पुलावर वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा व त्यापूर्वी हरणाचा मृत्यू झाला होता.