शेतकर्यांकडे डोळेझाक करणार्या सरकारवर टीकास्त्र
वर्धा : तीन वर्षाच्या काळात भाजप सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून हे सरकार भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री मंत्र्यांना क्लीनचीट देण्यात मशगुल असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पवनारच्या सभेत केला. शेतकर्याच्या कापसाच्या शेतात नांगर फिरवण्याचे काम दु:खद अंत:करणाने करावे लागले. हे बघून शेतकर्याचे काळीज करपून जात आहे.
आतातरी देवेंद्र फडणवीस सरकारने डोळे उघडावेत आणि कापसाला हेक्टरी 25 हजारांची मदत दयावी आणि जो कापूस निघाला आहे त्याला 500 रुपये बोनस दयावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. सभेच्या सुरुवातीला सेलु तालुक्यातील जुनोना गावातील शेतकरी मुरलीधर नागमोते यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मुरलीधर नागमोते या शेतकर्याने दीड लाखाच्या कर्जापायी शेतात जावून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला बुधवारी सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र आज त्या शेतकर्याने शेवटचा श्वास घेतल्याची बातमी सभेच्या ठिकाणी येऊन धडकली.
