जेरुसलेमच इस्रायलची राजधानी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णयाने खळबळ
न्यूयॉर्क/वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल अवीबऐवजी जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून घोषित केले. त्यांनी अमेरिकेबरोबरच आंतरराष्ट्रीय नियमांना डावलून हा निर्णय घेतला. या निर्णयाने जगात खळबळ माजली आहे. अमेरिकेचा दूतावास आणि इतर कार्यालये जेरुसलेमला हलवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. जेरुसलेम इस्त्रायलची राजधानी घोषित करण्याच्या या निर्णयाने इस्त्रायलला आनंद झाला असला तरी जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाने पश्चिम आशियात अशांतता पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर ट्रम्प यांनी हा निर्णय शांतता कायम राखण्यासाठी घेतला असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी न दिलेला असा हा ऐतिहासिक निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. व्हाईट हाऊस प्रवक्त्याने बुधवारी या निर्णयाची घोषणा केली. मध्य आशियातील शांतता प्रक्रियेला या निर्णयाने धक्का पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षात जेरुसलेम नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे.
