Breaking News

मिहान प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण


मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर 2018 पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.यासंदर्भात आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. येरावार बोलत होते. ते म्हणाले की, मिहान प्रकल्पाला 1 हजार 500 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. मिहानअंतर्गत सेझमध्ये 71 कंपन्यांना जागा देण्यात आली असून त्यापैकी 30 टक्के कंपन्या कार्यरत आहेत. पाच कंपन्यांमध्ये बांधकाम सुरू आहे. उरलेल्या 45 कंपन्यांमध्ये काम सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ मागितलेल्या कंपन्यांना काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या अटीवर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाने एप्रिल 2016 पासून पुढे चारवर्षाची मुदतवाढ दिली आहे. ग्रामीण भागातील तेल्हारा, दहेगाव, कलकुही व खापरी (रेल्वे) येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खापरी (रेल्वे) गावाजवळ करण्यात आले असून पुनर्वसन अभिन्यासातील कामे पूर्ण झाली आहेत. 

शहरी भागातील शिवणगाव, जयताळा, भागरी व चिंचभूवन येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चिंचभुवन येथील नवीन पुनर्वसित गावठाणाजवळ करण्यात येत असून 1 हजार 99 पात्र प्रकल्पग्रस्तांपैकी 1 हजार 23 प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. चिंचभूवन येथील नवीन पुनर्वसित गावठाणातील रस्ते, भूमिगत गटारे, पाणीपुरवठा योजना आदी कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. मिहानमुळे बाधित झालेल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला घर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.