Breaking News

हे तर फसणवीस सरकार : खा. चव्हाण


केवळ आश्वासने देऊन सगळेच प्रश्न लटकवत ठेवणारे हे फडणवीस नाहीतर 'फसणवीस' सरकार आहे, असा टोला कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी लगावला. राजोपाध्येनगर येथे महापालिकेच्या बॅडमिंटन कोर्ट आणि बॉक्सिंग रिंगच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
खा. चव्हाण म्हणाले, शहराचा, राज्याचा, देशाचा विकास करण्याची क्षमता केवळ कॉंग्रेसमध्ये आहे, हे समजले आहे. त्यामुळेच जनता आता कॉंग्रेसच्या मागे भक्कम उभी रहात आहे. भाजप सरकारने फक्त आश्वासनेच दिली. काँग्रेस सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल स्वीकारला, आरक्षणाची भूमिका घेतली. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भुमिका घेतली. पण भाजप सरकारने मात्र हा प्रश्न लटकवत ठेवला आहे. हे सरकार फसविणारे आहे. निवडणुकीआधी दिलेली किती आश्वासने गेल्या तीन वर्षात पूर्ण केली. सगळेच प्रश्न आहे तसेच ठेवले आहेत.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका २०१८ मध्येच होतील, असा अंदाज व्यक्त करून ते म्हणाले, आता या फसवणुकीतून सुटण्यासाठी २०१९ चे आव्हान आहे. आगामी सरकार कॉँग्रेसचेच आले पाहिजे, यासाठी सर्वानीच मेहनत घेतली पाहिजे. नेते एकत्र येऊन चालणार नाही, तर सर्वानीच एकत्र झाले पाहिजे. कदाचित २०१८ मध्येच निवडणूका होतील, ते गुजरातच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहेत. पण तिथेही राहूल गांधी यांचा झंझावात पाहता काँग्रेसचा विजय निश्चित आहे.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.