Breaking News

परिक्षा काळात महाविद्यालया मध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाविद्यालयात कॉपीचे प्रकार वाढून, शिक्षकांना दमबाजी होत असताना परिक्षा काळात शहरातील महाविद्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, गौरव शिंदे, किरण मांडे, अक्षय गायकवाड, प्रमोद गांगर्डे, ओंकार थोरात, संजू दिवटे, राहुल नेटके, लखण धोत्रे, विश्‍वनाथ आवारी, अजय दिवटे, अजिंक्य भिंगारदिवे, ऋषीकेश वाव्हळ आदिंसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



नुकतेच नगर कल्याण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात एका नगरसेविकेच्या मुलीची कॉपी पकडल्याने एका प्राध्यापकास मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले. अशा प्रकारे प्राध्यापकांना मारहाण होत असेल, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा व त्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा घटनांवर चाप बसविण्यासाठी प्राध्यापकास झालेल्या मारहाणीचा तपास करावा व परिक्षा काळात महाविद्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाविद्यालयांना परिक्षा काळात पोलिस बंदोबस्त न मिळाल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा वैभव ढाकणे यांनी दिला आहे.