Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन

जामखेड/ ता.प्रतिनिधी/- जामखेड तालुक्यातील शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शासकीय विश्रामगृहावरून सरकारच्या विरोधात घोषणा देत रॅली काढली. सदर रॅली तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर युवकांनी भाजप सरकार व पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वजण शासकीय विश्रामगृहावर जमा झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली यावेळी युवकांची रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत तहसील कार्यालयासमोर आली. तेथे युवकांनी सरकारच्या विरोधात व विशेष करून पालकमंत्री राम शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले.

युवक नेते व नगरसेवक पवनराजे राळेभात म्हणाले, लोकप्रिय घोषणा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी सातत्याने रस्त्यावर यावे लागते. हेच सरकारचे मोठे अपयश आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी नगरपरिषदेची सत्ता ताब्यात घेतली. पण एकही विकासाचे काम केले नाही. नगरपरिषद स्थापन होण्याअगोदर पासून हे मंञी आहेत. परंतु कायमस्वरूपी मुख्याधिकारी आणता आला नाही. मुख्याधिकारी व विविध खातेप्रमुख नसल्याने एकही काम होत नाही.

युवक नेते स्वप्निल खाडे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. अच्छे दिनच्या नावाखाली जनता भरडून निघाली आहे. तालुक्यात एकही विकासाचे काम झाले नाही. पालकमंत्री राम शिंदे विकास कामे करण्यात नापास झाल्याचा आरोप केला. तर पाटोद्याचे माजी सरपंच समीर पठाण व तालुका युवक अध्यक्ष शरद शिंदे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, विषारी औषधामुळे बळी पडलेल्या मुलामुलींची शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षण तात्काळ द्यावे, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती कमी कराव्या, शेतीमालाला हमी भाव मिळावा,शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफ करावे आदी मागण्या केल्या.

यावेळी माजी अध्यक्ष नरेंद्र जाधव, शेवगाव बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, अॅड. मयुर डोके, अमोल गिरमे, गणेश हगवणे आदींची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, राष्ट्रवादी नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, विश्वनाथ राऊत, शरद भोरे, युवक नेते प्रशांत राळेभात, नगरसेवक अमित जाधव, पवनराजे राळेभात, विकास राळेभात तसेच राजेंद्र गोरे, योगेश राळेभात, प्रदीप पाटील, महालिंग कोरे, बिभीषण परकड, रामहरी गोपाळघरे आदी उपस्थित होते.