Breaking News

मुंबई साबांच्या शेतावर भ्रष्ट अभियंत्यांची टोळधाड,न्यायमंदीरातील भंगारावरही केला हात साफ.

मुंबई/विशेष प्रतिनिधी : मध्य मुंबई बांधकाम विभागांतर्गत असलेल्या शाखा अभियंत्याने सुट्टीच्या मुहूर्तावर भंगाराची परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्रार करूनही साबां प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने साबांचे शेत भ्रष्ट अभियंत्यांची टोळी कसत असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. हे प्रकरण अन्य प्रकरणांपेक्षाही गंभीर असताना कुठलीच हालचाल होत नसल्याने साबां प्रशासन मुर्दाड बनले की कातडी गेंड्याची झाली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


मुंबई साबां प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत शहर इलाखा विभागाच्या अखत्यारीत राज्य शासनाची अनेक महत्वाची कार्यालये, विधीमंडळ, आमदार निवास, न्यायमंदीर आणि विशेष महत्वाच्या व्यक्तींसह शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांची निवासस्थाने आहेत. परिणामी सुरक्षेच्या दृष्टीने देखभाल दुरूस्ती व अन्य महत्वाच्या बांधकामाची जबाबदारी शहर इलाखा वर सोपविण्यात आली आहे, म्हणून या विभागाला प्रेसिडन्सी असेही संबोधले जाते. मात्र या नावाचे प्रेस्टीज जपण्याचे भान अभियंत्यांनी ठेवले नाही उलट या प्रतिष्ठेला कलंकीत करून सुरक्षेला आव्हान देण्यात साबांची कार्यशैली हशील मानत आहे.

आमदार निवासात डागडूजी करतांना कोट्यावधीची हेराफेरी चर्चेत असतांना मध्य मुंबई साबां विभागाच्या भ्रष्ट अभियंत्यांनी न्यायमंदीरालाही अपवाद केले नाही. न्यायमंदीराच्या आवारातही चोरी करण्याचा नतद्रष्टपणा केल्याचा प्रकार आ. चरणभाऊ वाघमारे यांनी उघडकीस आणला आहे. या संदर्भात तपशीलवार वृत्त असे की, माझगांव उच्च न्यायालयाच्या सेवा केंद्रातील गुलमोहर इमारती मधील विविध आकाराच्या एकूण 52 खिडक्या व लोखंडी ग्रील दि. 11फेब्रूवारी व 12 फेब्रूवारी 2017 या दोन दिवसात चोरीस गेल्याचे दि.13 फेब्रूवारी 2017 रोजी निदर्शनास आले. हे दोन्ही दिवस सुटीचे होते. त्याचाच फायदा लाटून चोरट्यांनी हात दाखविला असल्याची शक्यता आहे. ही बाब माझगाव शाखेचे स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यकांनी 13 फेब्रूवारी रोजी लेखी अर्जाद्वारे मध्य मुंबई च्या कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र फेब्रूवारीपासून आज अखेर अर्जात नमूद केलेल्या चोरी प्रकरणावर कुठलीही चौकशी करण्याचे धारिष्ट मध्य मुंबईच्या कार्यकारी अभियंत्यांनी दाखविले नाही, यावरून चोर कुणी बाहेरचे नाहीत तर गृह शार्वलिकांनीच हात मारल्याची शंका व्यक्त होऊ लागली. या शंकेला दुजोरा देणार्‍या आणखीही बर्‍याच गोष्टी प्रकाश झोतात येऊ लागल्याने आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या प्रकरणानंतर जातीने लक्ष्य घातले आणि सत्य बाहेर येण्यास सुरूवात झाल्याचा दावा आमदारांनी केला.

ज्या ठिकाणी हे भंगार होते त्या मंदीराच्या आवारात चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त असतो. इतकेच नाही तर हे आवार उच्च न्यायालयाचे असल्याने सीसीटीव्ही कॅमेरेही तैनात आहे. तरीही हे भंगार चोरीला गेले. बाहेरचा चोर या ठिकाणी भंगार चोरी करण्याची हिम्मत करणार नाही. ज्याने हे काळे कृत्य केले तो सीसीटीव्हीत कैद झाला असणार. फुटेज पाहून ओळख पटविणे सहज शक्य असताना साबां प्रशासन ढिम्म आहे यावरून साबांतील कुणा जाणकार व्यक्तीने हे काम केले असावे अशी शक्यता धरता येते. या ठिकाणी नेहमी वावर असणार्‍या साबांशी संबंधित अभियंता - कर्मचार्‍यांने सुट्टीच्या अंधारात किंवा उजेडात हे भंगार बाहेर काढले. नेहमीचे कार्यरत चेहरे असल्याने बंदोबस्तावरील पोलीसांनीही त्यांना विरोध केला नसावा, या शक्यतेचा तपास करतांना आ. चरणभाऊ वाघमारे यांनी या ऐंशी लाखाच्या चोरीसाठी शाखा अभियंता विजय बापट यांच्यावर ठपका ठेवला आहे.

आ. चरणाभाऊ वाघमारे यांनी या संदर्भात ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार दिली असून मुख्यमंत्र्यांनाही साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शहर इलाखाचे आमदार निवास गैरव्यवहार प्रकरण आणि मध्य मुंबईचे उच्च न्यायालय सेवा केंद्रातील भंगार चोरी हे दोन्ही प्रकरणावर साबां मंत्र्यांना जाब विचारण्याची तयारी आमदारांनी केल्याचे समजते.