धोम-बलकवडीचे पाणी शुक्रवारी सोडणार
सहपालकमंत्र्यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना
सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : फलटणच्या पूर्व भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन शुक्रवार, दि. 31 रोजी सोडण्यात यावे, असे आदेश सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी सातारा दौर्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सिंचनाच्या पाण्याचा आढावा घेतला. फलटण पूर्व भागात पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चारा पिके, डाळींब आणि द्राक्षे पाणी टंचाईमुळे शेतीव्यवसाय अडचणीत येवू लागला आहे. त्या अनुषंगाने गेली अनेक दिवस धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, अमोल खराडे यांच्या नेतृत्वाखाली फलटणच्या पूर्व भागातील काही गावांच्या सरपंचांनी सहपालकमंत्री खोत यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, सहपालकमंत्री खोत यांनी गेल्या आठवड्यात मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली होती.
दरम्यान, खोत सातारा जिल्हा दौर्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहावर मुंबईत झालेल्या बैठकीची माहिती देऊन अभियंत्यांबरोबर चर्चा केली. बैठकीत पाण्याची उपलब्धता, शेतकर्यांची मागणी, धरणातील राखीव पाणीसाठा याची माहिती घेण्यात आली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धोम-बलकवडी धरणात 2.35 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून कृष्णा प्रकल्पात सोडावयाचे 0.53 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे उर्वरित पाण्याच्या अनुषंगाने खोत यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्क साधला. यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाला.
या निर्णयामुळे खंडाळ्याबरोबरच फलटण पूर्व भागातील ढवळ, तरडफ, उपळवे, जाधवनगर, गिरवी, बोडकेवस्ती, विंचुर्णी या गावासह परिसरातल्या अनेक शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे.