Breaking News

राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकासाचे महत्त्वाचे योगदान - चंद्रकांत पाटील


राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकास यांचे योगदान महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात‘महाराष्ट्राच्या गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अमूल्य योगदान’ या विषयावर ते बोलत होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले, राज्य चालविण्यासाठी कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो. महसूल जमा करण्याची ही पद्धत 5 हजार वर्षांपूर्वीपासून चालू आहे. कुठलेही काम करण्यासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. कुठलीही परवानगी देताना शासन कायद्यानुसार महसुलाची आकारणी करते. महसूल संबंधीचे कायदे शासनामार्फत करण्यात येतात. हे कायदे लोकांना जाचक वाटू नये, याचा विचार करुन लोकांना काय अडचणी येतात याबाबत विचार होऊन कायदे तयार झाले पाहिजेत. 

लोकांनी मागणी न करता कायदा होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले. महसूल यंत्रणेतील प्रत्येक घटकाचा नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात संबंध येतो. शासनाच्या योजनांची माहिती, लागणारे विविध दाखले, महसूल यंत्रणेमार्फत दिले जातात. जनतेला विविध योजनांची माहिती, दाखले एकाच ठिकाणी मिळावे यासाठी ‘महाराजस्व अभियान’ महसूल यंत्रणेमार्फत राबविण्यात आले. सातबारा ऑन लाईन देण्यात येत आहे.