Breaking News

अधिक्षक अभियंता सुर्यवंशीसह शहर इलाखा गैरव्यवहारावर विधानसभेत लक्षवेधी

बापट यांच्या निलंबनाचा प्रस्ताव घेऊन मुख्य अभियंता नागपुरात



नागपुर/विशेष प्रतिनिधी :  मुंबई शहर इलाखा आणि मध्य मुंबई साबांत झालेल्या गैरप्रकारांना पाठीशी घालून कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके व शाखा अभियंता विजय बापट यांना केलेले सहकार्य अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना चांगलेच भोवले असून गुरूवारी विधीमंडळाच्या कामकाजात या मुद्यावर लक्षवेधी आणण्यात आली आहे. 

दरम्यान साबां मंत्र्यांचा धाक दाखवून भ्रष्ट अभियंत्यांवर कारवाई होऊ नये म्हणून मुख्य अभियंत्यावर दबाव टाकणारे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्यावर निलंबनासारखी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सभागृहात आ. चरणभाऊ वाघमारे करणार आहेत. आ. चरणभाऊ वाघमारे आणि दै.लोकमंथनने छेडलेल्या या संघर्षाला लक्षवेधीच्या माध्यमातून न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे.

शहर इलाखा शाखेचा कार्यकारी अभियंत्यांचा पदभार सांभाळत असतांना श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी चक्क आमदारांनाच हात दाखविला. मनोरा आमदार निवास इमारत कुठल्याही क्षणी पडणार असे भासवून वातावरण निर्मिती केली आणि त्या आधारावर या इमारतीतील आमदार कक्षात दुरूस्ती कामांचा प्रस्ताव तयार करून तो अंमलात आणला. यात अनेक कक्षात कामे न करता बीले अदा केली. काही ठिकाणी मंजूरी एका ठिकाणी आणि काम भलतीकडे असा घोळ करून कोट्यावधीची हेराफेरी केली. माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघड झाल्यानंतर आ. चरणभाऊ वाघमारे आणि दै. लोकमंथनने पाठपुरावा करून या प्रकरणाची तक्रार केली. 

मात्र या तक्रारीला अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी दुर्लक्षित केले. साबां मंत्र्यांचा दबाव असल्याचा बनाव करून श्रीमती वाळके यांना पुरक ठरेल असे वातावरण निर्माण केले. तथापी मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याने नाइलाजास्तव प्रधान सचिवांच्या आदेशावरून अधिक्षक अभियंत्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. 

यात श्रीमती प्रज्ञा वाळके, आणि दोन सहअभियंता दोषी आढळले. त्यानंतरही प्रज्ञा वाळके यांना निलंबीत करता येणार नाही अशी साबां मंत्र्यांची इच्छा आहे, असे भासवून साबां प्रशासन आणि आ.चरणभाऊ वाघमारे यांची दिशाभूल केली. अन्य दोन सहअभियंत्यांना मात्र त्याच प्रकरणात निलंबीत करण्याची तत्परता दाखवली. 

हाच धागा पकडून आ. चरणभाऊ वाघमारे अरविंद सुर्यवंशी हे या प्रकरणाचे मुख्य सुत्रधार आहेत असा आरोप केला आहे. हे प्रकरण चर्चेत असताना मध्य मुंबई साबांच्या माझगाव शाखेचे शाखा अभियंता विजय बापट यांनी उच्च न्यायालय सेवा केंद्रातील तब्बल ऐंशी लाखाचे भंगार सुट्टीच्या दिवशी चोरून विकले. 

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी ही बाब कार्यकारी अभियंत्यांच्या तात्काळ निदार्शनास आणून दिली. ही बाब देखील आ. चरणभाऊ वाघमारे यांनी तक्रार अर्जाद्वारे उघड केली. त्यानंतर मुख्य अभियंता केडगे यांनी शाखा अभियंता विजय बापट यांना तात्काळ निलंबीत करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिक्षक अभियंत्यांना दिले. निलंबनाचा प्रस्ताव करण्याऐवजी या प्रकरणातही साबां मंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न केला. 

निलंबनासाठी राज्य शासनाची परवानगी नाही. विजय बापट यांना निलंबीत करू नका आसा साबां मंत्र्यांचा निरोप आहे अशी खोटी माहिती देऊन केडगे यांची दिशाभूल केली, आणि विजय बापट दोषी नाहीत हे सिध्द करण्यासाठी भंगारात असलेले लाकूड तपासणीसाठी व्हिजेआयटीला पाठविल्याचा खोटा अहवाल तयार केला.

ही सारी बनवाबनवी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली असून साबां मंत्र्यांनी मुख्य अभियंता केडगे यांना बापट यांच्या निलंबनाचा प्रस्ताव घेऊन तातडीने नागपूरला येण्याचे फर्मान सोडले आहे. राज्य शासनाची परवानगी नागपूरला देतो असेही सुचित केले आहे. 

दरम्यान शहर इलाखा प्रकरणी उद्या गुरूवार दि.14 डिसेंबर रोजी आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या लक्षवेधीवर गदारोळ होण्याची शक्यता असून लक्षवेधीचे गांभीर्य लक्षात घेता तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह सर्व दोषींविरूध्द गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

या सोबत या प्रकरणात अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी निभावलेली संशयीत भुमिका लक्षात घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. यावरून गुरूवारी निदान अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता या दोघांच्या निलंबनाची घोषणा सभागृहात होणार का? याकडे साबांसह महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून आहे.

बापट यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करा हा मुख्य अभियंता केडगे यांचा आदेश न मानता अरविंद सुर्यवंशी यांनी या संदर्भात दादांचे तोंडी आदेश आहेत अशी खोटी माहिती केडगेंना पुरविली. विजय बापट यांच्याकडून 30 लाख रूपये सुर्यवंशी यांनी घेतल्याची माहिती स्वतः बापट यांनी आ.वाघमारेना दिली अशी वाच्यता आहे.

आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी केलेली उच्च न्यायालयातील भंगार चोरी प्रकरणाची तक्रारी संदर्भात विजय बापट(शाखा अभियंता) प्रथमत: दोषी असल्याचे सुषमा गायकवाड(कार्यकारी अभियंता) यांनी पाठविलेल्या गोपनीय अहवालात नमुद केले आहे. 

त्यानुसार मुख्य अभियंता मुंबई यांनी बापट यांच्या केलेल्या बदलीस आज आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी बांधकाम मंत्र्यांची भेट घेऊन मंजूरी मिळवली त्यामुळे बापट यांची बदली अखेर झाली. अधिक्षक अभियंता सूर्यवंशीना ही सणसणीत चपराक मानली जात आहे. दरम्यान शाखा अभियंता बापट यांची मुख्य अभियंता स्वतःच चौकशी करून अहवाल देणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागात अधिक्षक अभियंत्यांच्या उदासीन, अकार्यक्षमतेने सारा घोळ केला असून अनेक कामांची मोजमाप पुस्तिकाच गहाळ करण्यात आल्या आहेत. शहर इलाखा शाखेत मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड करून गैरव्यवहार पचविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला तर नाशिकला मोजमाप पुस्तिकाच हरवल्या. 

मोजमाप पुस्तिका सापडत नाहीत, कामाच्या नोंदी मिळून येत नाहीत मग गुणपडताळणी अहवालाचा प्रश्‍न उद्भवत नाही. अशा परिस्थितीत कंत्राटदाराची बीले काढणार कशी? अधिक्षक अभियंत्यांनी जाणीवपुर्वक दाखविलेल्या या अकार्यक्षमतेमुळे शहर इलाखा शाखा, मध्य मुंबई आणि नाशिक साबां भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे.