Breaking News

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी

सांगली, दि. 30, डिसेंबर - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गिरीष पुरूषोत्तम गुमास्ते (वय 45, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) याला येथील सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी शुक्रवारी दहा वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सांगली जिल्हा अतिरिक्त सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी काम पाहिले.


संबंधित पीडीत मुलगी व गिरीष गुमास्ते हे ब्राम्हणपुरी परिसरात राहतात. दि. 4 ऑगस्ट 2015 रोजी गिरीष गुमास्ते याने त्या मुलीला आपल्या मारूती 800 या गाडीतून फिरवून आणतो, या बहाण्याने बोलावून घेतले. तिला गाडीत बसवून घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर दुस-या दिवशीही गिरीष गुमास्ते याने पीडीत मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केले.

त्या मुलीने घडलेला हा प्रकार आपल्या काही मैत्रिणींना सांगितला. ही घटना त्या मुलीच्या आईला समजताच तिने मिरज शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन गिरीष गुमास्ते याच्या विरोधात तक्रार दाखल केली. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक शिल्पा दुथडे यांनी तपास करून गिरीष गुमास्ते याच्याविरोधात येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.