Breaking News

शक्तिशाली भूकंपाने इंडोनेशिया हादरले

इंडोनेशियाच्या जावा बेटाला शुक्रवारी उशिरा रात्री भूकंपाचा शक्तिशाली धक्का बसला. यादरम्यान झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाल्याचे सूत्रांकडून समजते. 


जावा बेटाच्या सिपातुजा शहराच्या बाहेरील भागात भूगर्भात ९१ किलोमीटर खोलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या शक्तिशाली भूकंपाचे धक्के आजूबाजूच्या ३०० किलोमीटर अंतरावरील परिसरात जाणवले. संपूर्ण जावा बेटासह राजधानी जकार्तातही भूकंपाचे हादरे जाणवले.

याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.५ इतकी मोजण्यात आल्याचे जिओलॉजिकल सव्र्हेने म्हटले आहे. भूकंपादरम्यान इमारती कोसळल्याने सियामिसमध्ये एका ६२ वर्षीय व्यक्तीचा तर पेकालोंगनमध्ये एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वा नुग्रोहोंनी सांगितले. भूकंपामुळे काही ठिकाणी रुग्णालयाच्या इमारतींचेही नुकसान झाल्याने रुग्णांना तेथून हलविण्यात आले.