Breaking News

काँग्रेसची भ्रष्टाचारी प्रवृत्ती बदलणारी नाही

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची वर्णी लागताच भाजपाने पुन्हा एकदा काँग्रेसवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांचे नाव न घेता अध्यक्षपदी कोणीही असले, तरी काँग्रेसची तालेवार कार्यपद्धती आणि भ्रष्टाचारी प्रवृत्ती बदलणारी नाही, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केली. 


इकडे राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होत असताना विशेष सीबीआय न्यायालयाने कोळसा घोटाळा प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. कोडा यांच्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. 

हाच धागा पकडत पात्रा यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी प्रक्रिया एवढी खोलवर गेली आहे की, गेली चार वर्षे हा पक्ष सत्तेत नसला, तरीही त्यांच्या भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे आजही बाहेर येत आहेत. हीच काँग्रेसची खरी ओळख आहे, असे पात्रा म्हणाले.