Breaking News

मिहान प्रकल्पांत उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा


मिहान प्रकल्पात विविध क्षेत्रातील कंपन्या येण्यासाठी तयार आहेत. अनेक कंपन्यांशी बोलणे सुरू आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या गुंतवणुकी होणार असून रोजगार निर्मितीही होणार आहे. मिहान प्रकल्पामध्ये येणाऱ्या कंपन्यांना सुविधा देऊन उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
रामगिरी येथे मिहान प्रकल्पासंदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते, भूपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, नागपूर कार्यालयाचे एस. व्ही. चहांदे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.

मिहान प्रकल्पाजवळील एमआयडीसीच्या जागांवरही उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रकल्पातंर्गत येत असलेल्या गावांमध्ये तातडीने नागरी सुविधा पुरविल्या पाहिजेत. शिवणगांव, जयताळा, चिंचभुवन, खापरी येथील गावकऱ्यांचे प्रश्न सोडवून पुनर्वसन करावे. प्रकल्पामध्ये जमीन मिळालेल्या उद्योजकांनी संबंधित जमिनीवर उद्योग विकसित करावे.

ते पुढे म्हणाले, मिहानमध्ये फार्मा, ऑटोमोबाईल, नागरी उड्डयन, इलेक्ट्रीक कार आदी क्षेत्रातील कंपन्या येण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी जगभरात मिहानचे योग्य प्रकारे मार्केटींग करणे गरजेचे आहे. मार्केटींग झाल्यास येथील गुंतवणूक वाढून मिहानच्या माध्यमातून नागपूर जगाच्या नकाशावर ठळकपणे पुढे येण्यास मदत होईल.