Breaking News

कंत्राटी शिक्षकांपेक्षा रोजंदारीवरचे मजूर भाग्यवान! राजकीय ‘जोडे’ उचलण्याची आली नामुष्की

शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले जाते. मात्र या दुधाची गोडी ज्या शारदेच्या मंदिरात चाखायला मिळते, त्याचा मुख्य केंद्रबिंदू असलेला कंत्राटी शिक्षक हा सध्याच्या महागाईच्या काळात खूपच दळभद्री जीवन जगतांना दिसतोय. संस्काराचा शिल्पकार असलेला हा शिक्षक नोकरी कायम टिकविण्यासाठी वाट्टेल ते करतांना दिसून येत आहे. कायम शिक्षकाची नोकरी करणारा थोडाफार सुखी दिसत असला तरी कंत्राटी शिक्षकांपेक्षा रोजंदारीवर काम करणारा जास्त पैसे कमवीत असल्याने तो भाग्य ठरत आहे. 


मात्र मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी या कंत्राटी शिक्षकावर हल्ली राजकीय जोडे उचलण्याची नामुष्की आली आहे. सरकारचे चुकीचे धोरण या परिस्थितीला कारणीभूत असल्याने कंत्राटी शिक्षकांमधून सरकारविषयी मोठा संताप व्यक्त होत आहे.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणाचा वारसा सुरु असलेल्या या राज्यात शिक्षक आणि प्राध्यापकांकडे आजही गुरुच्या पवित्र नात्याने समाज पाहत आहे. परंतु, ज्ञानार्जनाच्या पाठीमागील त्याचे दुःख पाहायला कुणालाही वेळ नाही. उच्चशिक्षित असणारे प्राध्यापक, शिक्षकांत अनेकांचे एम. ए. बी. एड, एम. फील., नेट-सेट तर काहींनी डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे. 

परंतु वाढत्या बेरोजगारीमुळे शासनालाही हा उच्चशिक्षित वर्ग स्वस्तात उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचे ढेकणाप्रमाणे रक्त शोषले जात असून नकळत त्यांना अपेक्षेपोटी संस्थानिकांचे राजकीय जोडे सांभाळण्याचीही वेठबिगारी करावी लागत आहे. महाविद्यालयेही या हंगामी सेवकांना चांगलेच राबवून घेतात. गलेलठ्ठ लाखांत पगार घेणारा प्राध्यापक वर्ग मौज करत असताना यांच्या नशिबी मात्र कामाचा आणि अध्ययनाचे ओझे टाकले जाते. 

नाहीच ऐकावे तर आहे त्या हंगामी सेवेला खोडा बसण्याची भीती त्यांना सतावते. यांच्या मानधनाचा विचार केला तर एम. ए. बी. एड. धारकांना ७ ते ८ हजार रुपये तर पी. एच. डी. धारकांना मासिक १० हजार रुपये मानधन दिले जाते. साधारण प्रतिदिन ३०० रुपये रोजंदारी स्विकारुन जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्राध्यापक मंडळींपेक्षा दैनंदिन रोजंदारीने काम करणारे अक्षर आणि शिक्षणाची फारकत असणारे मजूर सध्या ४०० ते ५०० रुपये रोजंदारी कमवतात. त्यामुळे यापैकी खरा सुखी कोण, याचे उत्तर शिक्षणाचा गवगवा करणाऱ्या शिक्षणतज्ञांना कदाचित यातून मिळेलच.      

        प्राध्यापकांनी शिक्षणावर लाखो रुपये खर्च करुन पदव्या संपादन केल्या. शिक्षक आयुष्यभर एका विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असल्यामुळे दिवसभर पुस्तकात डोके खुपसत बसुनही पदरात काहीच पडत नाही. केवळ ‘खा भजे आणि वाहा ओझे’ असा हा प्रकार आहे. मात्र विद्यार्थ्यांसमोर काळजातील दुःखाची छटा चेहऱ्यावर उमटू न देता सुटा-बुटात वावरावे लागते. संस्था व्यवस्थापन तथा महाविद्यालय प्राचार्यांच्या मनधरणीत कसूर झाला तर संस्था त्यांना अडगळीच्या शाळेवर टाकून ‘नाक तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ देत असल्याचा अनेकांचा अनुभव असल्याने त्यांच्या जीवाचा कोंडमारा होत आहे.
         
शिक्षण संस्था आणि शासनाची मिलीभगत झाल्यामुळे कंत्राटी प्राध्यापक, शिक्षकांचा प्रश्न सुटत नाही. १० ते १२ वर्षांपासून लोकांना शिक्षण संस्था राबवून घेत आहे. निवड प्रक्रियेत  शिक्षणसंस्था गोंधळ घालून वशिल्याच्या जोरावर नव्याने येणारे लोक कायम होतात. मात्र जुने आहे तसेच राबतात. आमच्यापेक्षा खरोखर मोलमजुरी करणारा वर्ग सुखी आहे. - प्रा. अमोल ठोंबरे (अध्यक्ष, रयत कृती समिती) एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव. 

माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांवर आलेले गंडांतर पाहून बीएड करण्याकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. शिक्षणसंस्था आणि पदांना मान्यता देणारे शासकीय अधिकारी यांच्या ‘अर्थपूर्ण’ तडजोडीमुळे हंगामी शिक्षक चक्रव्यूहात सापडले आहेत. मात्र ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे.