Breaking News

कॅन्सर व हृदयरोगाच्या स्वस्त औषधांसाठी नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ येथे अमृत आऊटलेट फार्मसी


वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय,नागपूर व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासन अंगीकृत कंपनी एचएलएल लाईफ केअर लिमिटेडमार्फत अमृत आऊटलेट फार्मसी (Affordable Medicines and Reliable Implants for Treatment) सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या बरोबरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर आणि श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ या संस्थांमध्ये एचएलएल लाईफ केअर लिमिटेडमार्फत अमृत आऊटलेट फार्मसी सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनीद्वारे कॅन्सरच्या रुग्णांसाठी लागणारी २०२ प्रकारची औषधे, हृदयरोग रुग्णांसाठी लागणाऱ्या १८६ औषधी बाबी आणि १४८ इतर बाबी बाजारभावापेक्षा कमी दराने रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत असलेली वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅन्सर व हृदयरोग रुग्णांवर उपचार केले जातात.

केंद्र शासनाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या केंद्र शासन अंगीकृत कंपनीला देशभरात अमृत (Affordable Medicines and Reliable Implants for Treatment) आऊटलेट फार्मसी उघडण्यासाठी समन्वय अभिकरण (Nodal Agency) म्हणून नियुक्ती केली आहे.

वरील संस्थांमध्ये अमृत आऊटलेट फार्मसी सुरु करण्याच्या अनुषंगाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास व या करारावर स्वाक्षरी करण्यास संचालक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांना नुकत्याच जाहीर झालेल्या शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली आहे.