Breaking News

राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची सोमवारी निवड झाली असल्याची घोषणा करण्यात आली. तब्बल 19 वर्षांनंतर काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. तसंच गांधी कुटुंबातील काँग्रेसचे अध्यक्ष होणारे राहुल गांधी पाचवे सदस्य आहेत. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी याबाबतची घोषणा केली. राहुल गांधी बिनविरोध निवडण्यात आल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं. 


राहुल गांधी येत्या 16 डिसेंबरला अध्यक्षपदाचा भार स्वीकारतील. दरम्यान, राहुल गांधींच्या निवडीनंतर दिल्ली काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोडबाहेर एकच जल्लोष करण्यात आला. कार्यकर्त्यांनी रंगांची उधळण करुन, आनंद व्यक्त केला काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या 900 सदस्यांनी राहुल गांधींचे जवळपास 90 अर्ज दाखल केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्‍चित होते.निवडणूक अधिकारी एम. रामचंद्रन यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. घोषणा होण्याच्या आधीपासूनच काँग्रेस मुख्यालयाबाहेर जल्लोषाला सुरवात झाली होती.