Breaking News

राजेंद्र मोरे कृषीथॉन 'आदर्श दूध उत्पादक’ पुरस्काराने सन्मानित


कोपरगाव ता.प्रतिनिधी दि.३० - ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या १२ व्या आवृत्तीचे आयोजन दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान करण्यात आले होते. यादरम्यान राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत नाटेगाव (ता.कोपरगाव) येथील प्रगतशील दूध उत्पादक राजेंद्र आप्पासाहेब मोरे यांना 'आदर्श दूध उत्पादक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

गोपालन व्यवसाय हा शेतीचा प्रमुख जोडधंदा आहे. दुग्धव्यवसायाला चालना मिळावी व या क्षेत्रात करत असलेल्या आदर्श दुग्धउत्पादकांचा सन्मान व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कृषीथॉन आदर्श दुध उत्पादक पुरस्कारांसाठी तज्ज्ञांच्या समितीने राजेंद्र मोरे यांची निवड केली. पुरस्काराचे वितरण नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, नाशिक विभागाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.धनंजय परकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ.विसावे, माजी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रकाश झांबरे, जेष्ठ दुग्धव्यवसाय सल्लागार डॉ.सुरेश गंगावणे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे समाधान हिरे, कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, कार्यक्रम समन्वयक मुकुंद पिंगळे यांसह राज्यभरातील दूधउत्पादक, दूधप्रक्रिया उद्योजक व पशुवैद्यकाची या परिषदेला उपस्थिती होती.