Breaking News

मोदी खरे हिंदू नाहीतच - कपिल सिब्बल

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या धर्मावरून टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस नेते सरसावले असून, कपिल सिब्बल यांनी तर मोदी हे खरे हिंदू नाहीतच असा घणाघात केला आहे. त्यामुळे गुजरात निवडणूक प्रचारात विकासाचा मुद्दा मागे पडून जाती-धर्माच्या राजकारणाने वेग घेतला असल्याचे दिसते. 


काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यात मंदिरांना भेटी देत आहेत. बुधवारी त्यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली. मात्र मंदिर प्रवेशावेळी बिगर हिंदू रजिस्टरमध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली. यावरून राहुल गांधींची कोंडी करण्याचा भाजप नेते प्रयत्न करत असून सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात तुमच्या पंजोबांनी आडकाठी आणल्याचे टीकास्त्र मोदींनी सोडले होते. 

या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे खरे हिंदू नाहीतच, असा पलटवार केला. पंतप्रधान किती वेळा मंदिरात जातात? मोदींना हिंदू धर्माशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांनी हिंदू धर्माचा केव्हाच त्याग केला असून आता त्यांनी हिंदुत्व अंगीकारले आहे. प्रत्येक भारतीयाला आपला भाऊ, बहीण, माता मानणारी व्यक्तीच खरी हिंदू आहे, अशा शब्दात सिब्बल यांनी मोदींवर घणाघात केला.