Breaking News

मुख्याध्यापकांवर आक्षेपार्ह टीका केल्याने ८८ विद्यार्थिनींना केले विवस्त्र.


अरुणाचल प्रदेशमधील एका शाळेत मुख्याध्यापकांवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी सहावी आणि सातवीच्या इयत्तेतील ८८ विद्यार्थिनींना विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. 
पापुप पारे जिह्यातल्या तानी हप्पायेथील कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयातील ही घटना आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि एका मुलीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलेला एक कागद सापडला. शिक्षकांनी यासंदर्भात सहावी आणि सातवीच्या इयत्तेतील मुलींना विचारणा केली. मात्र हे कोणी लिहिले याबाबत एकाही मुलीने माहिती दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी या दोन्ही वर्गातील ८८ मुलींना शिक्षा म्हणून विवस्त्र होण्यास भाग पाडले. २३ नोव्हेंबरची ही घटना आहे.

या मुलींना २७ तारखेला विद्यार्थी संघटनांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली. मुलींनी दोन सहाय्यक शिक्षक आणि एका कनिष्ठ शिक्षकाविरोधात महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असली तरी अद्याप कोणाविरोधातही गुन्हा दाखल केलेला नाही.