Breaking News

विषारी दारू प्रकरणी 8 जणांना अटक

अहमदनगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील विषारी दारू प्रकरणी पोलिसांनी पांगरमल दारू प्रकरणातील 8 आरोपींना अटक केली आहे. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणा-या पांगरमल विषारी दारू प्रकरणात 9 जणांचा बळी गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे विषारी दारू पिण्यात आल्याने 2 जणांचा मृत्यु झाला होता.अहमदनगरच्या न्यायालयाने सर्व आरोपींना 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.


भीमराव आव्हाड,जगजितसिंग गंभीर,हमीद अली शेख,जाकीर शेख,संदीप दुग्गल,अजित सेवानी,याकूब शेख,भरत जोशी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.14 फेब्रुवारी 2017 रोजी नगर तालुक्यातील पांगरमल येथे निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत उमेदवारांनी आयोजित केलेल्या पार्टीत विषारी दारू प्राशन करण्यात आल्याने 9 जणांचा दुर्देवी मृत्यु झाला होता.तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले होते.त्यानंतर 2 दिवसां नंतर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे देखील विषारी दारूमुळे शिवाजी बापू चव्हाण(वय 27) व प्रल्हाद सोपान तुपेरे(वय 60) या 2 जणांचा मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली होती.

त्यावेळी पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, पांगरमल येथे वापरण्यात आलेली विषारी दारू नगर येथील जिल्हा सरकारी रूग्णालयाच्या कँन्टीनमध्ये तयार केली जात असल्याचे उघडकीस आले.बाबुर्डी घुमट दारूकांड प्रकरणातील विषारी दारू देखील जिल्हा रूग्णालयातच बनविण्यात आल्याचे व पांगरमल प्रकरणातील आरोपींचा बाबुर्डी दारूकांडाच्या या प्रकरणात थेट संबंध असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी पांगरमल प्रकरणी अटकेत असलेल्या 8 जणांना बाबुर्डी घुमट विषारी दारू प्रकरणात अटक केली आहे.