Breaking News

कपाशीच्या उभ्या पिकात नांगरणी शेतकर्यांचे पाणावले डोळे!


वीजेचा लपंडाव, कमी दाबाने मिळणारी वीज अन् पिकांना अपोषित वातावरण या सर्वच कारणांमुळे नगर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमाफीसाठी मोठा आटापिटा करत अनेक फॉर्म भरले. मात्र अद्याप पदरात काहीच न पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिकांवर पडणारा रोग त्यावर होणारा खर्च न परवडणारा असल्याने तसेच शासनाकडून पिकांच्या पंचनाम्यासाठी लागणार्या विलंबामुळे हताश झालेल्या बळीराजाने कपाशीच्या उभ्या पिकावर नांगर फिरवला. यावेळी त्याची अर्धांगिनी आणि जगाचा ‘पोशिंदा’ असलेल्या या बळीराजाच्या डोळ्यातुन टपटप आसवं पडली.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अशोक कोकाटे या शेतकऱ्यावर कापूस पिकाला बोंडअळी रोगाने ग्रासल्याने उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची दुर्दैवी वेळ आली. कापूस पिकाची लागवड करण्यापासून खुरपणी, औषधे यावर खूप पैसा खर्च करुन हातात़ोंडाशी आलेल्या पिकांवर नागंर फिरवताना ज्या वेदना होतात, हे त्या शेतकर्यालाच माहित अशी बोलकी प्रतिक्रिया कोकाटे यांनी ‘लोकमंथन’शी बोलतांना व्यक्त केली. 

तर भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे म्हणाले, की कर्जमाफीच्या फाँर्मनंतर महावितरण कार्यालय आता कापूस पिकांवरील फॉर्म अन् पंचनामे यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. शेतकर्यांचे ह़ोणारे हाल यामुळे शेतकरी भरकटत चालला आहे. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पीकांच्या पंचनाम्यासाठी तालुका पातळीवरील अधिकारी पाहणी करणार असून त्यानंतर जिल्हास्तरावरील अधिकारी यामध्ये बराचसा कालावधी जाउन शेतकरी भरकटला जाणार असल्याची चिन्हे आहेत.